तालुका उध्वस्त करू पाहणाऱ्यांना वेळीच रोखा !
रेल्वे घालवली कोणी हे ओळखा — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
बाहेरच्या रिमोटवर चालणारा लोकप्रतिनिधी आपल्याला नको — आमदार सत्यजित तांबे
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर प्रेम केले. 40 वर्षात सर्वांना अभिमान वाटेल असे काम केले. संगमनेर तालुक्याचा लौकिक वाढवला. निळवंडे धरण, थेट पाईपलाईन द्वारे पाणी यासाठी कोणीतरी कष्ट केले हे लक्षात ठेवा. आपण मंत्री असताना रेल्वे मार्ग निश्चित केला त्यावेळेस कोणतीही अडचण नव्हती. मग आता काय अडचण आली. रेल्वे घालवली कोणी हे ओळखा. याचबरोबर मागील एक वर्षात तालुक्यात वाढलेल्या अमली पदार्थांची तस्करी आणि यामुळे तालुका उध्वस्त करू पाहणाऱ्यांना वेळीच रोखा. असे आवाहन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून संगमनेर तालुक्याची रेल्वे पळवली आहे पेटून उठा असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

संगमनेर सेवा समितीच्या वतीने गणेश नगर येथे सांगता सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, उत्कर्षा रूपवते, दिलीप पुंड, अर्चना दिघे, डॉ. मैथिली तांबे, बाळकृष्ण महाराज कर्पे, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, चाळीस वर्षे जनतेने संधी दिली. त्या माध्यमातून सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या. प्रत्येकाला अभिमान वाटेल असे काम केले. संगमनेर बस स्थानक, निळवंडे धरण, थेट पाईपलाईन द्वारे पाणी याचबरोबर शहराची भरभराट आणि समृद्धी कशी होईल यासाठी काम केले. गरीब माणूस आनंदी होण्याकरता राजकारण केले. अगदी विरोधकही आपल्यावर व्यक्तिगत कधी टीका करत नाही.

मी मंत्री होतो त्यावेळेस रेल्वे मार्ग प्रस्तावित झाला. 400 कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. मग हा मार्ग घालावा कोणी. नवीन लोकप्रतिनिधी नेहरू गार्डन मधील रेल्वे आहे का पळून न्यायला हे उत्तर देतात . तालुका कोणत्या दिशेला चालला आहे. तालुक्यात गांजा, ड्रग्स अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. यांना कुणाचा हात आहे. काही लोकांनी विधानसभेमध्ये चुकीचे आरोप केले. विधानसभाच काय महाराष्ट्र तुमच्या आरोपांवर विश्वास ठेवणार नाही. हे लक्षात ठेवा.

निळवंडे धरण, विमानतळ, रेल्वे या गोष्टी पिढ्यापिढ्यांच्या असतात. विकासासाठी लढा सुरू राहणार आहे. जनतेची साथ गरजेची आहे. पुन्हा चुक होऊ देऊ नका. तालुक्यामध्ये कामे रखडवली जात आहेत. सर्व चुकीचे चालले असून तालुका उध्वस्त करणाऱ्या लोकांना वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, एक वर्षांमध्ये रेल्वे पळवली. उद्या पाणी पळवतील. संगमनेर तालुक्यातील जनतेने पेटवून उठले पाहिजे. एक डिसेंबरला येथील नवीन लोकप्रतिनिधी म्हणतो की रेल्वे पळवायला ती काय बागेतील रेल्वे आहे का आणि तीन तारखेला केंद्रीय मंत्री रेल्वे मार्ग बदलण्याचे सांगतात.
बाहेरच्या रिमोटवर चालणारा लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहे. संगमनेरची सत्ता येथे पाहिजे. हक्काची माणसं पाहिजेत. संगमनेर सेवा समितीची सत्ता आल्यानंतर रामनगर, गांधीनगर, श्रमिक नगर मधील गरीब जनतेला हक्काची घरे देण्यासाठी काम केले जाईल असे आमदार तांबे म्हणाले.
यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, उत्कर्षताई रुपवते दिलीप पुंड याचीही भाषणे झाली. संगमनेर शहरातील व गणेश नगर मालदाड रोड परिसरातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
