मुंबई व प्रमुख महानगरपालिका निवडणूका महायुती म्हणूनच लढणार – प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या महायुती म्हणूनच लढणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.

नागपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेधाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणूकासंदर्भात कशा प्रकारे पुढे जायचे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आपण स्वत: अशी आमची संयुक्त बैठक झाली. तसेच, भाजपाच्या कोअर कमिटीची ही बैठक झाली. महानगरपालिका निवडणूका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. परंतू, जिल्हा परिषद निवडणूका मधील आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या निवडणूका कदाचित लाबंणीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती मध्ये लढताना आगामी रणनिती आखण्याच्या दृष्टीने काही पध्दती विकसित करण्याची गरज व्यक्त केली होती. मुंबई व अन्य महानगरपालिकेच्या निवडणूकांमध्ये महायुती व्हायला हवी अशा अपेक्षा या बैठकीमध्ये सर्वांनी व्यक्त केली. त्यानुसार सर्व महानगरपालिका निवडणूकांमध्ये पक्षस्तरावर समित्या तयार करुन युतीचा फॉर्म्युला ठरविण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाल्याची माहितीही रविंद्र चव्हाण यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, महापालिका निवडणूकांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करुन पुढील नियोजन करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाईल व आगामी निवडणूका या महायुती म्हणून सकारात्मकरित्या लढण्याचा विचार व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई व अन्य महानगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकारमध्ये जनतेचे हिताला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. तसेच, लोकहिताच्या व विकासाच्या योजना जनतेपर्यंत सकारात्मकरित्या पोहोचविणे हे महत्वाचे आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी महायुतीमध्येच निवडणूका लढविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार काल रात्री आमची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माझ्यामध्ये झालेल्या बैठकीमध्येही मुंबई व अन्य महानगरपालिका निवडणूका या युती म्हणून लढल्या पाहिजे असा सकारात्मक विचार करण्यात आला. महायुतीबाबत आणि पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातील सर्व निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीमधील वरिष्ठ नेते वेळोवेळी निर्णय घेतील त्याचप्रमाणे महानगरपालिका निवडणूकांमधील जागावाटप हे लोकहित आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन ठरविण्यात येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

महायुतीमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस, आरपीआय आणि अन्य घटकपक्षांचाही समावेश आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!