अमली पदार्थ तस्करी अवैध धंदे रोखण्यात स्थानिक गुन्हे शाखे (एलसीबी) ला अपयश !
संगमनेर सह सर्वत्र अवैध धंदे आणि अमली पदार्थांचा धुमाकूळ
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरासह तालुक्यात अमली पदार्थांची विक्री तस्करी ने हैदोस घातला आहे. मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी उघड होत आहे. शहरासह तालुक्यात अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात ‘संगमनेर हे अवैध धंद्यांचा अड्डा’ झाले आहे. संगमनेर सह इतर भागातही सुरू असलेले अवैध धंदे, अमली पदार्थ तस्करी रोखण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) अपयश येत असल्याचे देखील समोर येत आहे.

नशिले पदार्थ युवकांची पिढी बरबाद करते. सर्वात घातक असणारे ड्रग्स देखील संगमनेर आणि जिल्ह्यात सहजासहजी उपलब्ध होत आहेत. विविध प्रकारच्या नशा करण्यासाठी औषधे, इंजेक्शन, गर्द, गांजा, चरस, गोळ्या आणि तत्सम प्रकारच्या सर्वच नशिल्या पदार्थांची भरघोस उपलब्धता संगमनेर शहर, तालुक्यासह जिल्ह्यात असल्याचे वारंवार उघड होत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी, तस्करी आणि सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी, रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा कार्यरत आहे. या शाखेकडून सर्वच घातक प्रकारांवर आळा घालण्याची अपेक्षा असते, मात्र काही महिन्यांपासून तसे होताना दिसत नाही.

छोट्या मोठ्या गुन्ह्यातील आरोपी पकडणे आणि किरकोळ मुद्देमाल हस्तगत करणे एवढे एकच काम एलसीबीच्या शाखेकडून होत असल्याचे बोलले जाते. मात्र अमली पदार्थ विक्री ड्रग विक्री तस्करी याबाबत मोठी कारवाई झाल्याचे दिसत नाही. जिल्ह्याबाहेरील पोलीस पथके जिल्ह्यात येऊन मोठमोठ्या कारवाया करीत आहेत. याचा पोलीस अधीक्षकांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. संगमनेरच्या अमली पदार्थ तस्करी बद्दल नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे देखील तक्रारी करण्यात आल्या आहेत. संगमनेरातील अवैध कत्तलखाने गोवंश हत्या देखील एलसीबी ला कायमस्वरूपी बंद करता आलेली नाही.

छोट्या मोठ्या शहर आणि तालुका स्तरावरील गुन्हेगारांचा समोर उच्चाटन करण्यात शाखेला अपयश आल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी संगमनेरात दादागिरी सुद्धा थैमान घातले होते. किरकोळ गावगुंड दादागिरी खंडणी वसुली हाणामाऱ्या दहशत निर्माण करत होते. आणि आताही ते सुरू आहे. गौण खनिज आणि वाळू तस्करी ही तर संगमनेर शहर आणि तालुक्याच्या पाचवीला पुजलेली आहे. संगमनेर शहरातील पोलीस नेमके काय करतात हा देखील संशोधनाचा विषय आहे. ‘डीबी’ सारखे पथक असताना देखील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याचे दिसते. मटका जुगार अंडे छुप्या पद्धतीने सुरू आहेत. पोलिसांना हे सर्व कसे चालते हे माहीत आहे. तरीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

संगमनेर शहरातील अमली पदार्थ तस्करी ड्रग्स विक्री या संदर्भाने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे. विद्यमान आमदार सत्यजित तांबे, अमोल खताळ यांनी देखील अमली पदार्थ तस्करी आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी आग्रही मागणी केली आहे. विधानसभेत देखील या समस्येवर आवाज उठवण्यात आलेला आहे. तरीही अशा अवैध उद्योगांना आळा बसला नसल्याने आणि याची सर्वात मोठी जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेकडून (एलसीबी) मोठ्या प्रमाणावर कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
