आटपाट नगरीतून जाणारी रेल्वे पळविणारे @ तेच ते आपले पूर्वेकडचे सुभेदार..!
युवकांची रोजगारांची संधी हुकली | व्यापारांच्या आर्थिक उलाढालित घाटा | नौकरदार वर्गाची अडचण
आटपाट नगरीचा विकास कधीच न बघवल्यामुळे पूर्वेकडच्या सुभेदारांनी या नगरीचा विकास कसा होणार नाही यासाठी कायम विकास कामात अडथळे आणून योजनांना खोडा घालण्याचे काम केले असल्याचे वारंवार समोर आले आहे पूर्वेकडच्या सुभेदारांचा इतिहास पाहता संपूर्ण परगण्यात फक्त काड्या करत फिरणे आणि जिथल्या तिथल्या सुभेदारांना त्रास देणे आणि विकासात खोडा घालणे एवढा एकच उद्योग पारंपारिक पद्धतीने केला गेला असल्याचे चित्र रयतेला पाहण्यास मिळते.

बहुचर्चित सेमी हायस्पीड रेल्वे आटपाट नगरातून जाणार होती या ठिकाणी मोठे रेल्वे स्टेशन होऊन व्यवसायिक हब तयार झाले असते. मात्र हे न बघवल्यामुळे पूर्वेकडच्या सुभेदाराने ही रेल्वे आपल्या गावातून कशी नेता येईल याचा कट असून रेल्वे स्वतःच्या गावाकडे वळवली आणि पळवली. या प्रकारामुळे आटपाट नगरीचे मात्र नुकसान झाले. युवकांची रोजगारांची संधी हुकली, व्यापाऱ्यांच्या आर्थिक विकासाचा स्पीड कमी झाला आणि नोकरदार वर्गांची झटपट होणारी दळणवळणाची साधने कमी झाली. याचा फटका सर्वसामान्यांना बसला. रेल्वे पळवून आटपाट नगरीच्या विकासात सुभेदाराने पुन्हा बिब्बा घातल्याचे सिद्ध झाले.

ही रेल्वे आटपाट नगरातून जावी म्हणून स्थानिक युवराजांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. सभागृहात आवाज उठवला. रेल्वे आटपाट नगरीतून गेल्याने आणि ती सरळ मार्गाने गेल्याने अनेक गावांचा विकास होईल, सर्वसामान्य रयतेला चांगले दिवस येतील, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशा विविध मागण्या युवराजांनी वारंवार केल्या मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही आणि पूर्वेकडच्या सुभेदाराने आपली कुटील चाल खेळत रेल्वे शेवटी आपल्या गावाकडे पळवली.

या रेल्वेसाठी आटपाट नगरीत बरेचसे भू-संपादन पूर्ण होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या, मोबदला देण्यात आला, पण मार्ग बदलण्याच्या चर्चेमुळे भीती व संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे, ज्यामुळे बाधित क्षेत्रातील नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. प्रकल्प रखडल्यामुळे स्थानिक युवकांवर बेरोजगारीचं संकट गडद होत आहे.

आजी माजी सुभेदारांनी एकमेकांना धडका द्याव्यात नव्याने आलेल्या नेत्यांनी या दोघांच्या भांडणात स्वतःला तुडव तुडव तुडवून घ्यावे. परंतु सर्वसामान्य गोरगरीब रयतेच्या विकासात खोडा घालू नये. वारंवार विकासाच्या बाता ठोकणाऱ्या नव्या साहेबांनी रेल्वे बाबत मात्र मौन बाळगले आहे. आटपाट नगरीच्या विकासासाठी तडजोड करणे त्यांच्याकडून रयतेला अपेक्षित नाही. मात्र कुठेतरी पाणी मुरतंय असा संशय रयतेला आहे. बेरोजगार युवकांची रोजगाराची संधी घालवू नये, त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून गुन्हेगार बनवू नये, जातीय धार्मिक दंगली घडविण्याचे प्रयत्न करू नये आणि विशेष म्हणजे त्यांना अमली पदार्थांच्या व्यसनात अडकवले जाऊ नये अशी माफक अपेक्षा रयतेकडून करण्यात येत आहे.
