संगमनेर पोलिसांच्या कारभाराविषयी नाराजी !
प्रतिनिधी —
संगमनेर पोलिसांच्या कार्यपद्धती विषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे. शहरांमध्ये घडणाऱ्या विविध घटना आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये गुन्हे दाखल करणे आरोपींची नावे टाकणे आरोपींची नावे बदलणे अशा संदर्भाने सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत असून पोलिसांच्या विविध गुणांच्या तपासाबाबत शासकता देखील व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य जनतेला चांगली वागणूक दिली जात नसल्याचे समोर आले आहे. काही पोलीस कर्मचारी दारू पिऊन ड्युटी करतात असा आरोप आता होऊ लागला आहे. तसेच पोलीस निरीक्षक देखील पोलिसांच्या असभ्य वागण्याला वैतागल्याचे चित्र समोर आले. पोलिसांना वरिष्ठांचा देखील दाख राहिला नसल्याचे सांगण्यात येत असून वरिष्ठांचा वचक कमी झाला आहे की काय अशी शंका घेतली जात आहे.

शहरात सर्वच आलबेल आहे असे चित्र नाही. विविध प्रकारचे अवैध धंदे छुप्या रीतीने सुरू आहेत. विशेषत: अमली पदार्थांना ऊत आला असून गांजा विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच मटका आणि जुगाराचे अड्डे देखील गुप्त पद्धतीने सुरू आहेत. चलता फिरता मटका मोबाईलचा वापर करून सर्रासपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे बेकायदेशीररित्या अवैध दारू विक्री देखील केली जात आहे. या सर्वच प्रकारांमुळे पोलिसांचा कारभार चांगल्या रीतीने चालला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

निवडणुकांचे वातावरण असल्याने अवैध उद्योगांची वाढ होण्याची शक्यता वर्तविले जात असून पोलिसांनी आणि वरिष्ठांनी देखील संवेदनशील संगमनेरच्या बाबतीत अधिक जागरूक राहायला हवे असे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करतात. पोलिसांनी राजकीय दबावाला झुगारून सर्वसामान्यांच्या हितासाठी कायदा राबवावा आणि कोणत्याही राजकीय नेत्याला सहकार्य न करता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस कृती करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
