लोकशाहीमध्ये पत्रकारिता क्षेत्राचे मोठे योगदान मात्र……
काही माध्यमे विशिष्ट अजेंडा राबवीत आहेत — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर | प्रतिनिधी —
भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना असून या राज्यघटनेने देशाला समृद्ध अशी लोकशाही दिली आहे. लोकशाहीमध्ये पत्रकारिता क्षेत्राचे मोठे योगदान असून ही लोकशाही अधिक समृद्ध करण्यासाठी सर्व पत्रकारांनी योगदान द्यावे असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांना शुभेच्छा देताना थोरात म्हणाले की, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन मराठी पत्रकार दिन म्हणून मोठ्या आनंदाने आपण साजरा करतो. पत्रकारितेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चांगल्या कामांच्या पाठीशी उभे राहण्याबरोबर चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी पत्रकारितेने काम केले आहे. या क्षेत्राला मोठा इतिहास असून सध्या मात्र काही माध्यमे हे विशिष्ट राजकीय अजेंडा वापरत आहेत. हे लोकशाहीसाठी घातक आहे. पत्रकारांनी निरपेक्षपणे काम करताना लोकशाही अधिक समृद्ध केली पाहिजे. याचबरोबर नागरिकांना मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देत चांगल्या कामांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.

अहिल्यानगर जिल्हा आणि संगमनेर मधील पत्रकारांनी सातत्याने चांगल्या कामांची दखल घेतली असल्याचे सांगून सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, पत्रकार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे सध्या माध्यमे बदलली आहेत. जनसंपर्काची साधने बदलली आहेत. परंतु रचनात्मक काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करत असून पत्रकारांच्या विविध भागण्यासाठी आपण सातत्याने विधान परिषदेमध्ये आवाज उठवला आहे. विमा योजनेसह पत्रकारांना शासकीय सुविधा मिळावा ही मागणी आपली कायम असल्याचे ते म्हणाले.

तर डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, पत्रकारिता हे माध्यम समाजाचा आरसा आहे. या क्षेत्रामध्ये काम करताना पत्रकार बांधवांची मोठी धावपळ होत असून सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. याचबरोबर आपण समाजाच्या हितासाठी कायम काम करत असून लोकशाही बळकट करत आहात याबद्दल अभिनंदन ही त्यांनी केले.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे व नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनीही सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
