संगमनेर शहरातील मैदाने आणि रिकाम्या जागांचा ड्रग्स घेण्यासाठी होतोय वापर !

 मोठे रॅकेट असण्याची शक्यता –एलसीबी करते काय ?

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहरातील ड्रग्स विक्रेत्याला पकडल्यानंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. सध्या एकच मोहरा हाती लागला असला तरी या अवैध धंद्यात अनेकांचे हात बरबटलेले आहेत. अनेक एजंट यामध्ये सहभागी असल्याचे ऐकण्यास मिळते. विशेष म्हणजे आरोपीला वाचविण्यासाठी महायुतीकडून पोलिसांवर सातत्याने दबाव आणला जात होता अशीही जोरदार चर्चा सुरू आहे. एकंदरीत पाहता शहराला विशेषत: तरुणाईला या अमली पदार्थांनी विळखा घातला आहे.

शहरातील मैदाने आणि मोकळ्या पडलेल्या जागा यांचा वापर दिवसा आणि रात्री छुप्या पद्धतीने ड्रग्सची नशा करण्यासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे. काही सुज्ञ नागरिकांनी ड्रग्स घेणाऱ्या अशा तरुणांचे, जमा झालेल्या टोळक्यांची छायाचित्रे देखील काढलेली असून आई-वडिलांना धोका देऊन शिक्षण आणि क्लासला जाण्याच्या नावाखाली हे तरुण नशेच्या आहारी जात आहेत.

संगमनेर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ ड्रग्स गर्द चरस गांजा याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची माहिती वारंवार उघड झाली आहे. “संगमनेर टाइम्सने” हे अवैध उद्योग वेळोवेळी चव्हाट्यावर आणले आहेत. मात्र पोलिसांनी याची कुठलीही दखल घेतली नसल्याचे वारंवार समोर येत होते. शहरात आता एका विक्रेत्याला पकडल्यानंतर हळूहळू तपासातून बरेच उघड होऊ शकते.

पोलीस अधिकाऱ्यांची मानसिकता हवी 

संगमनेर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाची तस्करी विक्री होते. विशेषतः पठार भागातील घारगाव पोलीस हद्दीत असे नशिले पदार्थ तस्करीच्या माध्यमातून येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे बोलले जात आहे. आळेफाटा बोटा बॉर्डरवर मोठ्या प्रमाणावर राज्यातून ड्रग्स आणि नशिले पदार्थ तस्करीसाठी आणले जातात. यात सहभागी असलेले तरुण कॉलेजच्या पाठीवर ठेवणाऱ्या सॅक मध्ये या मालाची वाहतूक करीत असल्याने सहसा कोणाच्या नजरेत भरत नसल्याचे सांगण्यात येते. मग अशा तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना शोधणार कोण ? सुमारे वर्षभरापूर्वी संगमनेर शहरामध्ये भर मध्यवस्तीत गर्द विक्री करणारा गुन्हेगार पकडला होता. नंतर पोलिसांच्या कारवाईत काहीच ठोस झाले नाही. पोलिसांनी केलेला तपास हा संशयास्पद होता. तो गुन्हेगार सुटला आणि परत काही महिन्यानंतर त्यालाच पुन्हा गर्द विक्री करताना पकडण्यात आले. नेमके पोलिसांचे लागेबांधे कोणाशी आहेत ? या ठिकाणी संशय घ्यायला वाव आहे. असे घातक अमली पदार्थ विकणारे मोकळे कसे राहतात हाच खरा सवाल आहे.

 स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी करते काय ?

आमदार सत्यजित तांबे यांनी पोलीस अधीक्षकांना संगमनेरातील अमली पदार्थ विक्री तस्करी च्या संदर्भाने पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तर या आधीच चिंता व्यक्त करीत या संदर्भात पोलिसांनी गांभीर्याने कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. या पत्रामध्ये पोलिसांच्या बाबत अनेक त्रुटी व्यक्त करतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिसांची महत्त्वाची शाखा म्हणजेच स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) नेमके काय काम करते असा सवाल आमदार तांबे यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही काय की स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नेमके अमली पदार्थ विक्रेते ड्रग डीलर्स तस्करी सापडत नाहीत की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते अशा विविध चर्चांना आता उधाण आले आहे. मुळात स्थानिक गुन्हे शाखेने रुटीन मधले गुन्हे वगळता अशा घातक, तरुणाईला संपवणाऱ्या, देशाच्या युवा पिढीला बरबाद करणाऱ्या वेगवेगळ्या अवैध धंद्यांवर कारवाया करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. ते मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा नेमके करते काय असाही सवाल उपस्थित झाला आहे.

शहरातील मैदानांचा ड्रग्स घेण्यासाठी वापर 

संगमनेर शहरातील काही मैदानांचा आणि मोकळ्या जागांचा ड्रग्स घेण्यासाठी वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. जाणता राजा मैदान, इंदिरानगर मधील मोकळी जागा, उपनगरा मधील मैदाने तसेच काही उद्याने याचा वापर ड्रग्स घेणारे नशेडी करत असल्याचे उघड झाले आहे. या मैदानावरील एका कोपऱ्यात झाडांचा आधार घेत किंवा आपल्या छोट्या मोपेड किंवा मोटरसायकलवर बसूनच इंजेक्शन गोळ्या ड्रग नशेच्या गांजाच्या सिगारेट घेण्याचे प्रकार सुरू असल्याचे तेथील नागरिकांना आढळून आले आहे. अनेक वेळा सुज्ञ नागरिकांनी त्यांना हटकले देखील आहे. परंतु ते कोणालाच जुमानत नसल्याचे दिसून येते. प्रवरा नदीचे घाट, नदीचे मोकळे पात्र याचा देखील वापर नशा करण्यासाठी केला जात आहे. या सर्व ठिकाणी पोलिसांचे पेट्रोलिंग असणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. पोलिसांची फिरती पथके आहेत की नाहीत असा सवाल देखील उपस्थित होतो.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!