संगमनेरच्या पोलीस आणि प्रशासनाचा बट्ट्याबोळ !
प्रचंड राजकीय दबाव….
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर पोलीस आणि प्रशासनातील सर्व खात्यांमध्ये बट्ट्याबोळ झाला असून अधिकारी कनिष्ठ अधिकारी कर्मचारी हे राजकीय दहशतीखाली वावरत असल्याने जनतेच्या सर्वसामान्य कामांवर देखील परिणाम झाला असून मूलभूत सोयी सुविधांपासून समाज वंचित राहत आहे.

राजकारणातले फेरबदल संगमनेर शहरासह तालुक्याला आता अडचणीचे ठरू लागले असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. दोन प्रकारचे राजकीय वरदहस्त असलेले गट अतितटीचा सामना करीत असून त्याचा परिणाम पोलिसांसह प्रशासनाच्या सर्वच विभागांवर झाला आहे.

पोलिसांची एकतर्फी भूमिका असल्याचे बोलले जात असून सत्तेच्या दबावाखाली पोलीस एकतर कारवाई करत नाहीत आणि कारवाई केली तर ती सर्वसामान्यांना त्रासदायक होईल अशा प्रकारे केली जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यातच काही दिवसांपूर्वी दोन-तीन गटांमध्ये बचावाची शिवीगाळ आणि थेट मारामाऱ्या देखील झाल्या होत्या पोलीस हतबल पणे सर्व पाहत होते. कुठलीही कारवाई मात्र होताना दिसत नाही.

शहरात गुंडागर्दीचे प्रमाण वाढले आहे अनेक वेळा कारवाया होऊनहीं तेच तेच गुंड गुन्हे आणि दादागिरी करताना दिसत आहेत पोलिसांचा धाक दबाव उरलेला दिसत नाही अवैध धंदे सुरू आहेत गांजा ड्रग्स सरस कत्तलखाने निर्धोकपणे सुरू आहेत आणि मटक्याचे अड्डे देखील संगनमताने सुरू आहेत एकंदरीत पोलिसांचा कारभार हा खाकी वर्दीला साजेसा होत नसल्याचे चित्र आहे.

तर दुसरीकडे प्रशासनातील सर्वच विभागांवर देखील राजकीय दबाव आणि दोन गटांचा प्रभाव असल्याने त्यांच्या कामकाजावर देखील परिणाम होत असल्याचे दिसते. नगरपालिकेच्या कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. नागरिकांनी नुकताच पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. शहरांमध्ये रस्त्या रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण, वाहतुकीला होणारे अडथळे, अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या कामांची होणारी हेळसांड यामुळे पालिका प्रशासनाविषयी नाराजी पसरलेली आहे.

महसूल प्रशासनाबाबत देखील नाराजी व्यक्त होत असून वाळू तस्करी आणि गौण खनिज तस्करी नेहमीप्रमाणे सुरू आहे. वशिल्यावाले आणि राजकीय वरदहस्त असणारे आपापला धंदा तेजीने करत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. एखादी लुटुपुटूची कारवाई करून महसूल विभाग देखील आम्ही कारवाई करत आहोत असे भासवत आहे. त्यामुळे सर्वच विभागांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे.
सर्वच अधिकाऱ्यांमध्ये अनास्था पसरलेली आहे..
गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबावाचे वातावरण, दोन गटांकडून होणारी दादागिरी, अवैध उद्योगांना आलेला ऊत, किरकोळ गोष्टींमध्ये देखील राजकीय हस्तक्षेप आणि शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी येणाऱ्या अडचणी, विविध आरोप प्रत्यारोप या सर्व प्रकारामुळे सर्वच विभागातील अधिकारी प्रचंड दबावाखाली आहेत. त्यातच काही टोळ्यांकडून खंडणी वसुलीचे प्रकार देखील सुरू आहेत. हप्ते गोळा करण्यासाठी दबाव देखील टाकण्यात येतो. या सर्व प्रकारामुळे अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या कामाबद्दल अनास्था निर्माण झाल्याचे चित्र येत आहे.
