संगमनेरचे वातावरण खराब करू नका !!
पालकराव ‘तेढ’ निर्माण करण्यासाठी ‘तेल’ ओतण्याचा उद्योग करत आहेत…
पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणा काय करतात ?
दोघांच्या राजकारणासाठी संगमनेरच्या जनतेला वेठीस धरू नका !
विशेष प्रतिनिधी, संगमनेर —
उठ सूट काहीही झाले तर स्वतःचे कामधंदे सोडून संगमनेरला चकरा मारणारे आणि संगमनेरची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रक्षोभक भाषण करणारी मंडळी जनतेसमोर उघडी पडत चालली आहे. काही दिवसांनी संगमनेरात महिलांचे नळावर भांडण झाले तरी हे आपले गाव सोडून संगमनेरात ढवळाढवळ करायला येतील अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे. कुठल्याही घटनेचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘उपटसुंभ’ मंडळींचा जनता चांगला समाचार घेत आहे.

दुसऱ्याचे झेंडे आणि दुसऱ्याचे नेतृत्व घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजणारे आणि पोट भरणारी मंडळी संगमनेर तालुक्यात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मात्र अशा मंडळींच्या उद्योगामुळे आता संगमनेरची शांतता धोक्यात येऊ लागल्याने आपण ‘कोणाला किती उरावर घेऊन नाचायचं’ याचा विचार सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळीने करावा अशी अपेक्षा आता सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

सध्या संगमनेरात फक्त आंदोलन – आंदोलनाविरुद्ध आंदोलन, क्रियेला प्रतिक्रिया प्रतिक्रियेला पुन्हा क्रिया, आरे ला का रे, आरोप प्रत्यारोप, एवढेच उद्योग चाललेले असून त्यासाठी पोलीस व प्रशासनाचा आणि राजकीय सत्तेचा गैरवापर करणे. आपल्या हातात असलेल्या विविध सत्ता श्रोतांचा वापर करून प्रशासन पोलिसांवर दबाव आणणे असे उपद्व्याप सुरू असल्याचे चित्र आहे.

आपली प्रशासकीय जबाबदारी न ओळखता किंवा त्यावर कार्य न करता पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि यासंबंधी जबाबदारी असणारे सर्वच प्रशासकीय अधिकारी या सर्व घटनांना आळा घालू शकत नसल्याचे दिसत आहे. स्वतःचे हात आणि अंतरात्मा बरबटलेला असल्याने दबाव आणणाऱ्या राजकीय नेत्याला रोखण्याची मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये राहिलेले नाही. त्यामुळे अशांतता माजवणाऱ्यांची चलती असून ‘संगमनेर मध्ये गुंडागर्दीचे राज्य’ सुरू होते की काय अशी शंका आता समाजातून व्यक्त होत आहे.

गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतला तर निवडणुकीच्या आधी अशा घटना घडण्यास सुरुवात होते. धार्मिक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्यातून अशांतता निर्माण होते. पोलीस आणि प्रशासनावर त्याचा ताण देखील पडतो. मग पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणा काय करतात असाही सवाल उपस्थित होतो. ज्याच्या हातात सत्ता, सरकारचा पाठिंबा आहे तो सांगेल तसा कायदा राबवला जात असल्याची उदाहरणे पाहण्यास मिळत आहेत. जिल्ह्याचे पालकराव समाजा समाजात तेढ निर्माण करण्यासाठी, धार्मिक वादात तेल ओतण्यासाठी, अशांततेला, गुंडागर्दीला खतपाणी घालण्यासाठी कार्यरत असल्याचे देखील नेहमीच समोर येते.

दोन्ही महान नेत्यांना निवृत्त होण्याची वेळ झाली आहे. पोर बाळ कधीच सत्तेच्या राजकारणात आले आहेत. मात्र राजकारणापायी एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करण्याच्या नादात सामान्य नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे भान या मंडळींना राहिलेले नाही. उलट आपल्याला अनेक वर्षांपासून जनतेने स्वीकारून आपल्याला पालकत्व दिले याची जाणीव देखील राहिलेली नाही. समाजात शांतता, धार्मिक सलोखा टिकवण्याचे वाढवण्याचे आणि समाज विकासाकडे नेण्याचे कार्य रिटायरमेंट आली असली तरी या मंडळींना जमत नसेल तर अशा राजकीय पुढार्यांचा समाजाला खरंच उपयोग आहे का? याचा विचार व्हायला हवा.
