सातबारा नावावर करण्यासाठी मुन्नाच्या पाठीमागे भक्कम उभे रहा — आमदार खताळ
श्रमिक नगरच्या प्रश्नावर ठाम भूमिका, मुन्ना पुंड यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तुमच्या जागेचा उतारा तुमच्या नावावर करून देतो, मात्र नगरपरिषद निवडणुकीत अभिजीत उर्फ मुन्ना पुंड यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा. मागे मी तुम्हाला शब्द दिला होता त्यामुळे मी शब्दाला जागणारा कार्यकर्ता आहे. असा ठाम विश्वास आ अमोल खताळ यांनी श्रमिकनगरच्या रहिवाशांना दिला

संगमनेर नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार अभिजीत उर्फ मुन्ना पुंड यांच्या प्रचारार्थ श्रमिक नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत आमदार खताळ बोलत होते यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ उपस्थित होत्या.

आमदार खताळ म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांत अनेकांना संधी दिली गेली मात्र श्रमिकनगरच्या उताऱ्यांचा प्रश्न कोणीही मार्गी लावला नाही. सन १९७७ साली माजी मंत्री स्व. बी.जे. खताळ पाटील यांनी या नागरिकांना जागा दिल्या, पण त्या जागांचे उतारे आजपर्यंत त्यांच्या नावावर झाले नव्हते. “हा प्रश्न आता शंभर टक्के मार्गी लावण्याची जबाबदारी मी घेतो,” फक्त तुम्ही मुन्ना च्या पाठीमागे उभे रहा फक्त एका वर्षात प्रभाग क्रमांक एकमध्ये सुमारे २ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करून विकास कामे सुरू केल्याचे सांगत, “मतदान केलं किंवा नाही याची पर्वा न करता प्रत्येक प्रभागात समान काम करणे हे माझे कर्तव्य आहे,” आणि ते पूर्ण करणार.

विरोधकांवर टीका करताना आमदार खताळ म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. इमारती बांधून देतो, अशी आश्वासने देणारे उतारे कसे देणार हा प्रश्न श्रमिकनगरकरांनी विरोधी उमेदवाराला विचारला पाहिजे असे सांगत खताळ म्हणाले की, या भागातील जागेचे उतारे तुमच्या नावावर करून दिल्यानंतर प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून घरे बांधून दिली जातील. नगराध्यक्ष व नगरसेवक हे शिवसेनेचेच होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत महायुती सरकारच्या माध्यमातून उतारे तुमच्या नावावर करून देण्याची जबाबदारी आमची आहे. पण जर का काही गडबड झाली तर त्याचे होणारे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील त्या वेळी मी काही करू शकत नाही.

कोणत्याही दबावाला बळी न पडता मुन्नाच्या पाठीमागे भक्कम उभे रहा असे आवाहन आ खताळ यांनी श्रमिक नगरकर वासीयांना केले. यावेळी सर्व श्रमिक नगरकरांनी आपल्या अडी अडचणी आणि समस्या सोडविण्या साठी महायुतीच्या पाठीमागे भक्कम उभे राहावे असे आवाहन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ तसेच उमेदवार अभिजीत उर्फ मुन्ना पुंड यांनी श्रमिकनगरकर वासीयांना केले.
