अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासनाची सकारात्मक भूमिका- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
अहिल्यानगर, दि. १८ – अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांविषयी शासन सकारात्मक असून त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘अल्पसंख्याक हक्क दिन’साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, उपशिक्षणाधिकारी संजयकुमार सरवदे, महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कुंदा गोडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व अल्पसंख्याक समाज बांधव उपस्थित होते.

जिल्हा अल्पसंख्याक समितीची दर तीन महिन्यांनी बैठक आयोजित करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. अल्पसंख्याक समाजाच्या समस्या सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच जी प्रकरणे शासनस्तरावर प्रलंबित असतील, त्यांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यात येतील, असे सांगत उपस्थित अल्पसंख्याक प्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
सर्वप्रथम जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी दीपक दातीर यांनी अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

अल्पसंख्याक समाजाच्या वतीने उपस्थित प्रतिनिधींनी समाजाच्या विविध मागण्या व समस्यांबाबत मते मांडली.
बैठकीला अल्पसंख्याक विभागाच्या योजना राबविणाऱ्या विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
