भंडारदर्याजवळचे उडदावणे होणार “मधाचे गाव”..!
अकोले तालुक्यातील उडदावणे गावात ‘मधाचे गाव’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे रक्षण करणे, तसेच मध आणि मधमाशांपासून मिळणाऱ्या उत्पादनांवर प्रक्रिया व विक्री व्यवस्था निर्माण करून ‘मधुपर्यटन’ वाढवणे, या उद्देशाने अकोले तालुक्यातील ‘मौजे उडदावणे’ गावाची निवड करण्यात आली आहे. या गावात ‘मधाचे गाव’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मधाचे गाव’ योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत डॉ. आशिया बोलत होते.
या बैठकीस जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, सहाय्यक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किरण मोरे, उद्योग अधिकारी अशोक बेनके, उडदावणेच्या सरपंच कीर्ती गिरे, ग्रामसेवक श्रीमती जाधव, माजी सरपंच बच्चू गांगड, मध निरीक्षक व्ही. आर. चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “राज्यातील १० गावांमध्ये ‘मधाचे गाव’ योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, यात आपल्या जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उडदावणे गावाचा समावेश आहे. या गावातील २५ होतकरू तरुणांची निवड करून त्यांना मधमाशी पालनातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा. यासाठी त्यांना मध संकलन, प्रक्रिया, ब्रँडिंग, पॅकिंग तसेच मध, मेण, पराग यांपासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण द्यावे.”

तसेच, उडदावणे गावात सामूहिक सुविधा केंद्रासाठी जागेची निश्चिती करून तातडीने बांधकाम सुरू करावे. मधमाशांविषयी माहिती देणारे विशेष दालन आणि ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्यात यावा.
मधाच्या गावाची सर्वदूर प्रसिद्धी व जनजागृती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.
सुरुवातीला जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे यांनी योजनेच्या प्रगतीची माहिती दिली. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
