मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संगमनेरला १० कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर – आमदार अमोल खताळ
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व आशियाई विकास बँक यांच्यामार्फत संगमनेर तालुक्यातील दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी १० कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

यामध्ये चंदनपुरी ते शिरापुर या पुलाचे बांधकाम करणे यासाठी ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पिंपराणे ते घोडेझाप (कोलवाड) येथे ५० मीटर पुलाच्या बांधकामासाठी ७ कोटी २५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संगमनेर तालुक्यातील या दोन्ही कामांना ग्राम विकास विभागाकडून एकूण १० कोटी ५० लाख १४ हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महायुती सरकाराच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील अनेक विकासकामे झपाट्याने मार्गी लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागांना जोडणारे रस्ते तसेच पाणंद रस्त्यांच्या कामांमुळे तालुकाभर मजबूत रस्त्यांचे जाळे तयार होणार आहे. संगमनेरमधील शेतकरी, व्यापारी आणि भविष्याच्या दृष्टीने रस्त्यांची कामे महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार अमोल खताळ यांनी आभार मानले आहेत.

संगमनेर तालुक्यातील राजकारणाची दिशा बदलल्यानंतर या तालुक्यामध्ये विकास करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत आहे, पावसाळ्यामध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत असून या परिसरातील लोकांची अनेक वर्षांपासून पुलाची मागणी होती. त्या मागणीनुसार राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे निधीला मान्यता देण्यात आली आहे, त्यानुसार लवकरच कामे सुरू होणार आहेत. – आमदार अमोल खताळ, संगमनेर
