महिला व बाल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय बांधकाम आणि कामगार रुग्णालय उभारणीला गती द्या —
आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर नगरपरिषद हद्दीतील कॉटेज हॉस्पिटलमध्ये १०० बेडचे महिला व बालरुग्णालय उभारणे, घुलेवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे काम जलद गतीने पूर्ण करणे तसेच संगमनेरला कामगार रुग्णालय सुरू करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या मागण्यांवर आरोग्यमंत्री प्रकाश अबीटकर यांनी सकारत्मक भूमिका घेत आरोग्यविभागाच्या अधिकार्यांची यासंदर्भात तात्काळ निर्णय करण्या बाबतच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत अशी माहिती आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

संगमनेर विधानसभा मतदार संघातील आरोग्य सुविधांचा विकास, प्रलंबित प्रकल्पांचा वेगाने निपटारा तसेच नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विधान भवनातील जुने कामकाज समिती कक्षामध्ये मंत्री आबीटकर आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्याचे आरोग्यसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ.सुनीता गोल्हाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या उभारणी आणि बळकटी करणाशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली. त्यामध्ये संगमनेर नगरपरिषद हद्दीतील कॉटेज हॉस्पिटल येथे १०० खाटांचे अत्याधुनिक स्त्री व नवजात बालके रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रस्तावास तातडीने मार्गी लावण्या साठी आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आरोग्य विभागाला निर्देश दिले आहेत.

घुलेवाडी येथे सुरू असलेल्या नव्या उपजिल्हा रुग्णालय बांधकामाची गती समाधानकारक नसल्याची नोंद घेऊन बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आदेश देण्यात आले. कामगार व निम्न उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संगमनेरलाकामगार रुग्णालय सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया व निधी उपलब्धतेवर पावले उचलण्यात येतील तसेच बॉम्बे नर्सिंग होम संदर्भातील प्रश्न नगर विकास खात्याशी संबंधित असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या नियमांमुळे खासगी रुग्णालयांना अडचण निर्माण होऊ नये, तसेच नागरिकांना सेवा उपलब्ध राहाव्यात यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्यांवरही चर्चा होणार आहे. संगमनेर तालुक्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्या साठी आवश्यक त्या यंत्रसामुग्री, मनुष्यबळ , आपत्कालीन सेवा, तसेच जिल्हा स्तरावरील समन्वय या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून उपयोजना करण्यात येतील असे बैठकीत निश्चित करण्यात आले.
