‘लोकशाहीची हत्या ? – वोट चोरी’ विदारक सत्य प्रदर्शनाचे उद्घाटन
निवडणुकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
‘लोकशाहीची हत्या? वोट चोरी’ विदारक सत्य प्रदर्शनाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुणे येथे झाले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियातून व्यक्त केलेले मत…

आज सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या ‘सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह’ अंतर्गत ‘लोकशाहीची हत्या? – वोट चोरी’ या सद्यपरिस्थितीचे विदारक सत्य दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे येथे केले.
गेल्या काही वर्षांत देशातील निवडणुकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मतदानाचा हक्क हा लोकशाहीचा आत्मा आहे. हा आत्मा जिवंत ठेवायचा असेल, तर मतदान प्रक्रिया पारदर्शक, स्वच्छ आणि विश्वसनीय राहणे अत्यंत आवश्यक आहे.

या प्रदर्शनातून नागरिकांसमोर महत्त्वपूर्ण मुद्दे, तथ्ये आणि वस्तुस्थिती मांडले आहेत, कारण लोकशाहीचे रक्षण करणे ही प्रत्येक जागरूक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. मतांचा प्रामाणिकपणे उपयोग न होणे हा केवळ राजकीय प्रश्न नाही; तो देशाच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आहे.
सत्तेत राहण्यासाठी भाजपकडून कोणत्याही थराला जाऊन राजकारण केले जात आहे. ईव्हीएम प्रक्रियेबाबत गंभीर शंका निर्माण होत आहेत. धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी हे भाजपचे मुख्य राजकीय हत्यार बनले आहे. लोकशाहीचा मूलभूत ढाचा वाचवायचा असेल, तर आपण सर्वांनी पुढे येणे अत्यंत गरजेचे आहे.

२००४ ते २०१४ या काळात काँग्रेस सरकारने अन्न सुरक्षा कायदा, शैक्षणिक योजना, भू-अधिग्रहण कायद्यात सुधारणा, तसेच जागतिक स्तरावर गाजलेल्या पोलिओ निर्मूलन मोहिमेसह असंख्य लोककल्याणकारी उपक्रम राबवले. मात्र २०१४ नंतर, तांत्रिक साधनांचा गैरवापर, अफवा पसरवणे, जातीय ध्रुवीकरण या माध्यमातून सत्तेची मक्ता राखण्यात भाजप व्यस्त राहिला आणि परिणामी देशाची दिशा भरकटली आहे.
महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना आज धर्माचे उघडपणे राजकारण केले जात आहे. सोनम वांगचुक यांचे आंदोलन, हरियाणातील शेतकरी संघर्ष, महिला ऑलिम्पिक विजेत्यांचे आंदोलन, अगदी मुख्य न्यायाधीशांवर फेकलेला बूट अशा घटनांनंतरही काहीच कारवाई न होणे आणि जनतेचेही याविषयीचे मौन हीच तर खरी लोकशाहीची हत्या आहे.

आजच्या कार्यक्रमात काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे, लता राजगुरू, कैलास गायकवाड, अनिल सोडकर, प्रथमेश आबनावे, चेतन अग्रवाल उपस्थित होते.
