संगमनेर मधील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमचे कॅमेरे बंद !
प्रशासनाबाबत संशयाचे वातावरण ; मेमरी संपुष्टात येत असल्याने उपकरणे बदलताना कॅमेरे थोडा वेळ बंद झाले होते — प्रशासनाचा खुलासा
स्ट्रॉंग रूमच्या प्रवेशद्वारासमोर उमेदवार प्रतिनिधींचे ठिय्या आंदोलन
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग क्षमता संपुष्टात येत असल्याकारणाने मेमरी वाढविण्यासाठी जी उपकरणे लागतात ती बदलताना काही काळ सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याने संशयास्पद वातावरण निर्माण होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रशासनावर वेगवेगळे आरोप होत असून ईव्हीएम मशीनच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेमरी साठी लागणारी उपकरणे बदलताना नगरपालिका निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना किंवा उमेदवारांना कळविण्यात न आल्याने या संशयात अधिकच भर पडल्याने कार्यकर्ते उमेदवार आणि प्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये बराच काळ वादावादी झाली.

संगमनेर नगरपालिका निवडणुकीचे मतदानानंतरचे ईव्हीएम मशीन शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात खेळा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ठेवून त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आला आहे.
राज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकी मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम मशीन हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत. मात्र या स्ट्रॉंग रूमवर नियंत्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे काही काळ बंद झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला असून सर्व उमेदवारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूम मध्ये संगमनेर नगरपालिका निवडणुकीतील एक ते पंधरा प्रभागांमध्ये झालेल्या सर्व निवडणुकांचे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहे. हे ईव्हीएम मशीन सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी व शासकीय प्रतिनिधी यांच्या साक्षीने बंद करण्यात आले आणि त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.
मात्र आज रविवारी हे सीसीटीव्ही कॅमेरे सुमारे एक तास बंद झाल्याने सर्व नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे तातडीने संगमनेर सेवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याचे निदर्शनात येताच कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम कडे धाव घेतली. यावेळी नागरिकांनी क्रीडा संकुलाच्या बाहेर प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

ईव्हीएम मशीन आणि त्याची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असून सध्या देशांमध्ये आणि राज्यांमध्ये ईव्हीएम बाबत नागरिकांमध्ये पूर्णपणे संभ्रम आहे. त्यातच अशा घटना वाढल्याने आणखी दुजेरा मिळत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे मेमरी उपकरणे बदलण्याच्या संदर्भाने बंद करण्यात आले होते. याचे समाधानकारक उत्तर मात्र मिळू न शकल्याने प्रशासकीय अधिकारी पोलीस यांच्या बरोबर बराच वेळ उमेदवार व प्रतिनिधींचे वाद झाले.

सत्ताधारी काहीही करू शकतात – विश्वास मुर्तडक
देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी ईव्हीएम च्या जोरावर निवडणूक जिंकत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी काहीही करू शकतात. त्यातच संगमनेर मध्ये एक तास सीसीटीव्ही कॅमेरे बंद हा काय प्रकार आहे हे प्रशासनाने सांगितले पाहिजे. काही वेगळे करण्याचा दबाव तर प्रशासनावर नव्हता ना अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली असल्याचे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी म्हटले आहे
