राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूरचा दबदबा !
मुलांच्या गटात पुण्यावर तर मुलींच्या गटात नाशिक वर विजय
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दहा तारखेपासून रंगलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रोमांचक सामन्यांची मेजवानी पाहायला मिळाली. सकाळपासून सुरू झालेली ही स्पर्धा रात्री नऊपर्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली.

मुलांच्या गटात अंतिम सामन्यात कोल्हापूरने पुण्यावर अतिशय थरारक असा, श्वास रोखून धरायला लावणारा विजय मिळवत लक्षणीय कौशल्याची चमक दाखवली. दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ सादर केला; मात्र अखेर कोल्हापूरने निर्णायक क्षणी केलेल्या दमदार चढायांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
मुलींच्या सामन्यांमध्येही कोल्हापूरचाच दबदबा कायम राहिला. नाशिक विभागाविरुद्ध त्यांनी एकतर्फी विजय मिळवत आपली श्रेष्ठता सिद्ध केली. कोल्हापूरच्या मुलींच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाची शैली कायम ठेवत नाशिकच्या बचावफळीला चांगलाच त्रास दिला.

विजयी संघांच्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक,जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे,प्रांताधिकारी अरुण उंडे, संगमनेर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री.संतोष करवा,निवड समिती सदस्य श्री.आकाश शिंदे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी श्री. पोपट पाटील, संघटना प्रतिनिधी श्री. रवी गाडे, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी श्रीमती सायली केरीपाळे, मुख्य क्रीडा कार्यकारीअधिकारी श्री. गिरीश इरनाक, संघटना प्रतिनिधी श्री. रवी ढगे, संघटना प्रतिनिधी श्री.शंतनू पांडव तसेच तज्ज्ञ प्रतिनिधी सुधाकर सुंबे , संगमनेर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.अजितकुमार कदम यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सन्मान सोहळ्याने क्रीडांगणावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

स्पर्धेतील खेळाडूंची जिद्द, दमदार खेळशैली आणि कोल्हापूरच्या दोन्ही संघांची प्रभावी कामगिरी ही या दिवसाची खास आकर्षणे ठरली.
