बॅडमिंटन स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचे यश !
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 16
लोणीकंदच्या न्यू टाईम्स इंटरनॅशनल स्कूलच्या बॅडमिंटन मैदानावर रंगलेल्या सीबीएसई क्लस्टर बॅडमिंटन स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने चमकदार कामगिरी करताना रौप्य पदकासह गौरवचिन्ह पटकावले. अचूक फटकेबाजी आणि प्रतिस्पर्ध्याची दमछाक करणारी रणनिती घेवून मैदानात उतरलेल्या सर्वच स्पर्धकांनी अतिशय चुरशीची झूंज दिल्याने या स्पर्धेचा रोमांच शिगेला पोहोचला होता. अतिशय अतितटीच्या सामन्यात ध्रुवच्या चौघांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना अक्षरशः घाम फोडताना रौप्य पदकासह चषकही पटकावले.

मुलांच्या एकोणावीस वर्षांखालील गटात सात्विक केला, स्वरुप सोमाणी, विराज पेटकर आणि अदित गांधी यांनी प्रतिस्पर्ध्याची दमछाक करण्याची योजना घेवून जोरदार फटकेबाजी आणि जलद प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सामन्याचा रोमांचा वाढून सुरुवातीपासूनच अतितटीचा मुकाबला सुरु झाला. उपस्थित प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार्या या चौघांच्या खेळाने उपस्थित प्रत्येकालाच टाळ्या वाजवण्यास भाग पाडले.

प्रशिक्षक प्रशांत भंडारी यांचे मार्गदर्शन आणि जिद्दीने रोजचा अभ्यास सांभाळून केलेला सराव यामुळे नवव्या क्लस्टर बॅडमिंटन स्पर्धेत चार रौप्य पदकांसह चषक मिळवता आला अशी प्रतिक्रिया ध्रुवच्या स्पर्धकांनी दिली. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे व क्रीडा विभागाचे प्रमुख गिरीश टोकसे यांनी अभिनंदन केले आहे.
