संगमनेरमध्ये १० डिसेंबरपासून राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा
१७ वर्षांखालील मुला-मुलींचे संघ दाखवणार दमदार खेळी
संगमनेर प्रतिनिधी दि. 7
तालुक्यातील क्रीडा संस्कृतीला नवी उंची मिळवून देणारी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २०२५-२६ येत्या १० ते १२ डिसेंबर दरम्यान संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रंगणार आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून १७ वर्षांखालील मुला-मुलींचे संघ सहभागी होणार असून रोमांचक कबड्डी सामने पाहण्यासाठी संगमनेरकर उत्सुक आहेत अशी माहिती संगमनेर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष करवा, सचिव डॉ.रवींद्र गायकवाड,उपसचिव रुपेश वालझाडे, ॲड.संग्राम जोंधळे यांनी दिली.

ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर यांच्या वतीने शिक्षण प्रसारक संस्था क्रीडा संवर्धन समिती, संगमनेर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ आणि ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा संवर्धन समितीचे रवी पवार, अनिल सातपुते, नरेंद्र चांडक, संदीप चोथवे यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी सर्व सुविधा, क्रीडांगणाची तयारी, खेळाडूंचे निवास- भोजन आणि सुरक्षा यांसह सर्व बाबींची काळजीपूर्वक आखणी पूर्ण झाली आहे. तीन दिवस राज्यातील तरुण खेळाडूंची कौशल्ये पाहण्याची संधी संगमनेरकरांना मिळावी म्हणून विशेष दर्शकदीर्घा खास इचलकरंजीहून मागवण्यात आली आहे. या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड आणि क्रीडा शिक्षक डॉ.अजितकुमार कदम यांनी केले आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून,आयोजकांच्या वतीने सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
