अकोले तालुक्यात २०० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होणार
२०० कोटींची गुंतवणूक ; १ हजाराहून अधिक रोजगाराची संधी –
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला ‘पंप स्टोरेज हब’ बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या सामंजस्य करारांतर्गत अकोले तालुक्यात २०० मेगावॅट क्षमतेचा ‘सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्प’ (Pumped Storage Project) उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी ‘न्यु एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. अकोले तालुक्यात सुमारे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक या माध्यमातून होणार असून, यामुळे स्थानिकांसाठी १,०५० रोजगार निर्मिती होणार आहे.

*राज्यात २३,८०० कोटींची गुंतवणूक :* राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी एकूण ५४ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामध्ये अकोले येथील प्रकल्पासह पश्चिम घाट (५,२०० मेगावॅट) व कोयना टप्पा-६ (४०० मेगावॅट) या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या करारांतून राज्यात सुमारे २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, ११,५०० नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे राज्याची वीजनिर्मिती क्षमता ७६,११५ मेगावॅटपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
