आमदार अमोल खताळ हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबाव नको.. !
तपासात ‘फ्री हॅन्ड’ मिळाला तर सत्य समोर आणणे सोपे होईल…. अनेकांच्या भावना
या संवेदनशील प्रकरणाचा तपास सुरू असताना वेगवेगळ्या मार्गांनी जे कोणी पोलिसांवर आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव, दडपण आणण्याचा प्रयत्न करतील त्या सर्वांच्या नोंदी स्टेशन डायरीला घेण्यात याव्यात असे जाणकार मंडळींचे म्हणणे आहे.
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक झाल्यानंतर त्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. आता या घटनेचा तपास सुरू झाला आहे. हल्ल्या मागचे कारण शोधण्यासाठी पोलीस कसून तपास करणार असल्याचे या आधीच अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्पष्ट केले आहे. असे असतानादेखील हा तपास करताना पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नसावा आणि तपासात त्यांना ‘फ्री हॅन्ड’ मिळाला तर या हल्ल्यामागचे सत्य नक्कीच बाहेर येईल, असा विश्वास आणि भावना संगमनेरचे नागरिक व्यक्त करतात. पोलिसांना जाहीररित्या मत व्यक्त करता येत नसले तरी खासगीत काही पोलिस अधिकारी व अनुभवी कर्मचाऱ्यांचे हेच मत आहे.

आमदार खताळ यांच्यावर ऐन गणेशोत्सवात संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे एका कार्यक्रमानंतर शेक हँड करण्याच्या बहाण्याने प्रसाद गुंजाळ या (खांडगाव तालुका संगमनेर येथील) तरुणाने हल्ला करत त्यांना मारहाण केली. त्याचवेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अटक करण्यात आली. न्यायालयात त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ही घटना घडल्यानंतर संगमनेर शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली होती. आजही उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियातून या हल्ल्याविषयी उलट सुलट प्रतिक्रिया आल्या. आजही व्यक्त होत आहेत. राजकीय, व्यक्तिगत, आर्थिक व्यवहाराचे, पूर्वाश्रमीची मैत्री यावर अनेक टिका टिपण्या, प्रतिक्रियांच्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियातून व्हायरल झाल्या. सर्वच स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. तालुक्यातील जवळजवळ सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी पुढाऱ्यांनी आणि तरुणांनी या घटनेचा निषेध केला.

असे जरी असले तरी आता पोलिसांचा याबाबत तपास सुरु आहे. सर्व तांत्रिक बाबी देखील तपासल्या जातील. हल्ल्या मागचे कारण व्यक्तिगत आहे की राजकीय आहे याचा देखील शोध घेतला जाईल. आरोपीकडे चौकशी करून याबाबत सविस्तर आणि जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न होईल. हे करत असताना आणि हा तपास पूर्ण झाल्यानंतर जे काही समोर येईल ते जनतेसमोर आणताना पोलिसांवर कुठलाही दबाव आणला जाऊ नये. तसेच तपास करताना देखील याच दिशेने करा, त्याच दिशेने तपास करा असा दबाव आणि सूचना देखील त्यांना केल्या जाऊ नयेत. राजकीय हितसंबंधांचे वापर करून तपासात अडथळे आणले जाऊ नयेत. अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. असे जर झाले तर एकदाच ‘दूध का दूध पाणी का पाणी’ होऊन जाईल त्यामुळे नागरिकांची विश्वासहार्यता जपण्यासाठी सत्यसमोर आणा अशी आग्रही मागणी केली जात आहे.

या संवेदनशील प्रकरणाचा तपास सुरू असताना वेगवेगळ्या मार्गांनी जे कोणी पोलिसांवर आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव, दडपण आणण्याचा प्रयत्न करतील त्या सर्वांच्या नोंदी स्टेशन डायरीला घेण्यात याव्यात असे जाणकार मंडळींचे म्हणणे आहे.
