बिबट – मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग सज्ज !
पालकमंत्र्यांच्या हस्ते रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढता बिबट-मानव संघर्ष प्रभावीपणे हाताळण्यासाठी वनविभागास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या रेस्क्यू वाहनांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते निळवंडे येथे करण्यात आले. या वाहनांमुळे वनविभागाला घटनास्थळी तातडीने पोहचण्यास मदत होणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १४ रेस्क्यू वाहनांना मंजुरी दिली होती. या वाहनांचा पुरवठा सुरू झाला असून, निळवंडे येथे आयोजित कार्यक्रमात अकोले येथील वनक्षेत्रपाल यांना बोलेरो कॅम्पर वाहनाची चावी सुपूर्द करून वाहन प्रदान करण्यात आले. ही वाहने वनविभागाच्या ताफ्यात दाखल झाल्याने बिबट-मानव संघर्षाच्या घटना घडल्यास क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करणे सुलभ होणार आहे.

या कार्यक्रमास आमदार अमोल खताळ पाटील, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्यासह जलसंपदा व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
