आरोप-प्रत्यारोप, टीका विसरून संगमनेरच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे  —

 संगमनेर नगरपालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची प्रतिक्रिया

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर नगर परिषद निवडणुकीत अभूतपूर्व ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संगमनेरच्या सुसंस्कृत आणि एक हाती सत्ता मिळाली असली तरी संयत भूमिकेत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हा विजय जनतेचा !

सर्वप्रथम या विजयाबद्दल संगमनेरच्या मतदारांचे संगमनेर सेवा समितीच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. आपला विश्वास आणि प्रेम मी कदापि विसरणार नाही.

हा विजय संगमनेरच्या सुसंस्कृत, पवित्र भूमीचा, इथल्या स्वाभिमानी जनतेचा, सामान्य माणसाचा, निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी व मित्रांचा, माझ्या कुटुंबाचा, संगमनेर सेवा समितीतील कार्यकर्त्यांचा, तसेच थोरात–तांबे कुटुंबीयांवर प्रेम करणाऱ्या संगमनेरकरांनी दिलेल्या आशीर्वादाचा विजय आहे.

गेली अनेक वर्षे आम्ही संगमनेरला आपल्या कुटुंबासारखे जपले आहे. प्रत्येक संकटात साथ दिली आहे. आयुष्याचा पाया रचणारे शिक्षण, विकासाला गती देणारे रस्ते, पाणीपुरवठा, जलसंधारण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. संगमनेरच्या मायबाप जनतेने प्रत्येक कामात तन-मनाने साथ दिली. आमच्यावर विश्वास ठेवला. संघर्षाच्या कठीण काळात केवळ पाठीशीच नाही तर खांद्याला खांदा लावून उभे राहिले हे मी कधीही विसरणार नाही.

ही निवडणूक खरी कसोटी पाहणारी होती. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील प्रचाराची धुरा आमदार सत्यजीत तांबे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. स्वाभिमानाची ही लढाई मायबाप जनतेने आपल्या खांद्यावर घेतली.

जात, धर्म, गरीब-श्रीमंत, पक्ष असा कोणताही भेदभाव आम्ही कधीही केला नाही आणि यापुढेही कदापि करणार नाही. आता केवळ संगमनेरचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. विरोधकांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली टीका, एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोप हे सर्व विसरून संगमनेरच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे.

निवडणूक संपल्यामुळे आता राजकारणाला पूर्वविराम देऊन विकासाचा, समाजकारणाचा, महिला भगिनींना सन्मान देण्याचा, युवकांना रोजगार देण्याचा नवा अध्याय आपण एकत्रितपणे लिहूया.

निवडणुकीच्या काळात माझ्याकडून चुकून, जाणते-अजाणतेपणाने कुणाचे मन दुखावले असेल किंवा कुणाचा अवमान झाला असेल, तर या सर्वांसाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. विजयाबद्दल आभार मानण्यापेक्षा कायम संगमनेरच्या ऋणात राहणे मला अधिक आवडेल.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!