विजयाची हवा डोक्यात गेली…!

दोन नगरसेवक आणि समर्थकांची विरोधकांच्या कुटुंबीयांना दादागिरी आणि जबर मारहाण !!

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

माजी आमदार आणि संगमनेर सेवा समितीचे मार्गदर्शक डॉक्टर सुधीर तांबे यांनी नगरपरिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली. निवडणूक काळात झालेले आरोप प्रत्यारोप टीका विसरून सर्वांनी एकत्रितपणे विकासासाठी काम करावे तसेच कोणतीही कटूता मनात ठेवू नये अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र विजयानंतर काही तासातच सेवा समितीच्या दोन नगरसेवकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी विरोधी कुटुंबीयांना जबर मारहाण करण्याची घटना घडली आहे.

या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नगरसेवकांसह समर्थकांवर गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक नूरमोहम्मद शेख यांची मिरवणूक सुरू असताना ती एका विरोधकाच्या घरासमोर आल्यानंतर शेख यांच्या समर्थकांनी दादागिरी करत विरोधकाच्या कुटुंबीयांना काठ्या लोखंडी रॉड चॉपर याचा वापर करीत जबर मारहाण केली आणि त्यांना गंभीर जखमी केले. निवडणुकीतील विजयाची हवा डोक्यात गेल्याने हा प्रकार झाला असून अशा घटना घडायला नकोत म्हणून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

संगमनेर शहर पोलिसांनी नगरसेवक नूरमोहम्मद शेख यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. इमरान गणी शेख, शहजाज सलीम शेख, दानिश सलीम शेख, सलमान सलीम शेख, वसीम अब्दुल रहमान शेख, उमेद शेख, अलीम हाजी शेख, रहमान शेख, तलहा कलीम शेख व रिजवान उस्मान शेख आणि इतर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

तर दुसरी घटना इंदिरानगर मध्ये घडली असून प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार वनिता गाडे, त्यांचे पती आणि समर्थकांनी मिरवणुकीचा गुलाल घरापुढे पडलेला असताना तो साफ करणाऱ्या कुटुंबीयांना दादागिरी शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. त्यामुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. संजय गाडे, वनिता संजय गाडे, शिवराज संजय गाडे, हरीश दिलीप थोरात, ओमकार थोरात, वैष्णव मुर्तडक, सागर कानकाटे यांच्यासह अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुकीचा पायंडा पाडू नका….

थोरात – तांबे यांचे राजकारण संपूर्ण संगमनेर नव्हेच तर महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारण म्हणून ओळखले जाते. तसा दावा थोरात – तांबे यांच्याकडून नेहमीच केला जातो. मात्र पहिल्यांदाच या निवडणुकांच्या विजयानंतर संगमनेर सेवा समितीच्या दोन नगरसेवकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी विरोधकांना मारहाण करून या विजयाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. असा चुकीचा पायंडा निदान सेवा समितीच्या पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांकडून पडू नये अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!