गांजाची शेती उद्ध्वस्त ; शेतकऱ्याला अटक

७ लाख ४३ हजार रुपयांचा गांजा जप्त

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गांजाची लागवड करणाऱ्या ७५ वर्षीय शेतकऱ्याला अटक केली. या कारवाईत ३७ किलो १९० ग्रॅम वजनाचा, सुमारे ७ लाख ४३ हजार ८०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘नशा मुक्त भारत’ अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बेलवंडी पोलीस ठाण्याच्या मदतीने कोथुळ येथे दाखल झाले.

पोलिसांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता, दिलीप गंगाधर लाटे (वय ७५, रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा) यांच्या घरासमोरील शेतात कडवळ पिकामध्ये गांजाची झाडे लावलेली आढळून आली. चौकशीदरम्यान संबंधिताने ही झाडे स्वतःच्या नशेसाठी लावल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी ३७ किलो १९० ग्रॅम वजनाची कॅनबिस (गांजा) वनस्पती जप्त केली. जप्त मुद्देमालाची किंमत ७ लाख ४३ हजार ८०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७९/२०२६ दाखल करण्यात आला असून, अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, १९८५ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे करत आहे.

पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, गांजा, अफू (खसखस) यांसारख्या प्रतिबंधित अंमली पदार्थांच्या पिकांची लागवड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारची लागवड आढळल्यास किंवा त्याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा स्थानिक गुन्हे शाखेला कळवावे. तसेच कृषी विभागानेही शेतकऱ्यांमध्ये याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!