कत्तलीसाठी नेली जाणारी गोवंशीय जनावरे वाचवली ; श्रीरामपुरात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
७ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त ; एक आरोपी ताब्यात, तिघांविरुद्ध गुन्हा
संगमनेर टाइम्स | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक व कत्तलीसाठी नेण्याच्या प्रकारांवर कारवाई करण्याच्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेली जात असलेली गोवंशीय जनावरे सुखरूप सोडवली. या कारवाईत ₹७ लाख ३५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली. पोउपनि विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, भगवान थोरात, रमिझराजा आतार आणि विशाल तनपुरे यांच्या पथकाने २२ जुलै रोजी श्रीरामपूर शहरातील मिल्लत नगर ते गोंधवणी रोड परिसरात गस्त घालत असताना ही कारवाई केली.

गुप्त माहितीच्या आधारे संशयित एमएच-०५ डीके-०६६१ या पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे दाटीवाटीने भरून कत्तलीसाठी नेली जात असल्याचे आढळून आले. वाहन चालक आबासाहेब विलास काळे (वय ३५, रा. वडगाव निपाणी, ता. श्रीरामपूर) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत ही जनावरे समीर बिलाल कुरेशी, वसीम अय्युब कुरेशी आणि सादिक फरीद कुरेशी (सर्व रा. कुरेशी मोहल्ला, श्रीरामपूर) यांच्या सांगण्यावरून कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली.

या कारवाईत १ लाख ३५ हजार रुपये किमतीची गोवंशीय जनावरे आणि ६ लाख रुपये किमतीची पिकअप गाडी असा एकूण ७ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विशाल तनपुरे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७१८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम, १९९५ (सुधारित २०१५) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविणे प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
