तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ; ६ जण ताब्यात, ३ लाख ६९ हजरांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील कामरगाव शिवारात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतले असून, एक जण घटनास्थळावरून पळून गेला आहे. या कारवाईत जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य, मोबाईल फोन व वाहने असा एकूण ३ लाख ६९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

२१ जुलै रोजी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत कामरगाव शिवारातील ताडपत्रीच्या शेडमध्ये काही जण तिरट नावाचा पत्त्यांचा हारजितीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकला. पोलिसांना पाहताच एक जण पळून गेला, तर सहा जणांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये चंद्रभान जयसिंग खोडवे, सोहम संदीप भिंगारदिवे, भाऊसाहेब जनार्धन ठोकळ, मनोज नाना झरेकर, किरण शाम भालके आणि शिवाजी दत्तात्रय दिवेकर यांचा समावेश आहे. तर चंद्रकांत नागनाथ दांदेवाड हा आरोपी फरार झाला असून, गोरक्ष दिलीप कातोरे हा संबंधित जुगार अड्डा चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२८/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत.
