अनैतिक व्यापार प्रकरणी…
‘आम्रपाली लॉज अँड बार’ बंद करण्याचे आदेश !
अहिल्यानगर | प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील आम्रपाली लॉज अँड बारमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत संबंधित आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी हा आदेश पारित केला आहे.
तपासानुसार, अहिल्यानगर-दौंड मार्गावरील काष्टी येथील या लॉजमध्ये मालक व चालकाकडून महिलांना बोलावून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जात होती. त्यानंतर ग्राहक उपलब्ध करून देत पैशांच्या मोबदल्यात अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणात उरुळी कांचन, चेंबूर, नालासोपारा, वाघोली, वाशी, भिवंडी आणि कलकत्ता येथील सात पीडित महिलांचा समावेश आहे. तसेच रणजित राम पुजारी, मुकेशकुमार गुरुदयाल यादव, नागनाथ लक्ष्मण इंगळे, ज्ञानेश्वर रमेश मुळीक, संदीप अशोकराव पाचपुते, किर्थिश सुधाकर हेगडे तसेच शिरूर येथील एका ग्राहकाविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी १५ जून आणि १९ जून रोजी सुनावणीची संधी देण्यात आली होती. मात्र, संबंधित व्यक्ती सुनावणीस गैरहजर राहिल्या. पोलीस विभागाच्या अहवालात संबंधित जागेचा वापर अनैतिक व्यापारासाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सार्वजनिक हित आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी लक्षात घेऊन ही कठोर कारवाई करण्यात आली.

प्रशासनाने नमूद केले आहे की, यापूर्वीही संबंधित आस्थापनेचा अशाच बेकायदेशीर कृत्यांसाठी वापर झाल्याची नोंद आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अंतर्गत संबंधित आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, भविष्यात या जागेचा पुन्हा अनैतिक व्यापार अथवा कुंटणखान्यासाठी वापर झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मूळ जमीन व घरमालकाची राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
