मेडीकव्हर हॉस्पिटलचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ‘२० हजारांची लाच’ मागितल्याचा गुन्हा

संगमनेर | प्रतिनिधी

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णाच्या उपचारासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी संगमनेरमधील मेडीकव्हर हॉस्पिटलच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे खासगी आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सुभाष दगडू धादवड (डेटा एंट्री ऑपरेटर) आणि सुजित दामोदर गायकवाड (ऑपरेशन मॅनेजर) यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 697/2026 अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 मधील कलम 7-अ व 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या आईचे ऑपरेशन व उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करून देण्यासाठी २०,००० रुपये द्यावे लागतील आणि त्याचे बिल मिळणार नाही, अशी मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. एसीबीने केलेल्या पडताळणीदरम्यान लाच मागणीची पुष्टी झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, “जे ठरले आहे त्यात कमी होणार नाही,” असे सांगून दुसऱ्या आरोपीनेही या मागणीस प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात प्रत्यक्ष लाच स्वीकारली गेली नसली तरी लाच मागणी आणि स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईचे तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे करत आहेत.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक किंवा संबंधित व्यक्ती लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!