शेंडी बायपासवर मोठी कारवाई !

विक्रीसाठी आणलेले ५ गावठी पिस्टल जप्त ; २ आरोपी जेरबंद

अहिल्यानगर | प्रतिनिधी –

अहिल्यानगर शहरातील शेंडी बायपास परिसरात विक्रीसाठी आणलेली ५ गावठी पिस्टल (कट्टे) जप्त करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून १० लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील शस्त्रपुरवठादार आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली.

गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी डेअरी चौक ते शेंडी बायपास मार्गावर सापळा रचण्यात आला. संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या स्कोडा कारवर छापा टाकून पिंटू उर्फ भाऊ आनंदा रसाळ (रा. रसाळवाडी, ता. पारनेर) आणि बंटी उर्फ स्वप्निल बिभिषण पाबळे (रा. कावळ पिंपरी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान आरोपींकडून ५ गावठी पिस्टले, २ मोबाईल फोन आणि स्कोडा कार असा एकूण ₹१०.९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीत आरोपी भाऊ आनंदा रसाळ याने ही पिस्टले धाराशिव येथील भैय्या उर्फ ऋषिकेश सुभाष भोसले याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. संबंधित आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

याशिवाय दोन्ही आरोपींनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी भाऊ आनंदा रसाळ याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दंगल आणि आर्म ॲक्टसह अनेक गंभीर गुन्हे पूर्वीपासून दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३/२५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!