संगमनेरात गोवंशीय मांस तस्करी प्रकरणात मोठी कारवाई ; संघटित गुन्हेगारीच्या नव्या कलमाखाली गुन्हा दाखल
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर शहर पोलिसांनी गोवंशीय जनावरांच्या मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध मोठी कारवाई करत भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) लागू केले आहे. नव्या कायद्यानुसार संगमनेरातील गुन्ह्यात हे कलम लावण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक, श्रीरामपूर कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै २०२६ रोजी रात्री संगमनेर–पुणे मार्गावर केलेल्या कारवाईदरम्यान एका छोट्या हत्ती वाहनातून सुमारे ५०० किलो गोवंशीय जनावरांचे मांस जप्त करण्यात आले. या कारवाईत अंदाजे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणात सलीम रियाज कुरेशी व अतिफ उर्फ सोनू रफीक कुरेशी (दोघेही रा. मोगलपुरा, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान दोन्ही आरोपी यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे कलम लागू करण्यात आले आहे.
आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी तयार करून वारंवार बेकायदेशीर गोवंशीय मांस वाहतूक व विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ अंतर्गत गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणातील एक आरोपी समद जावेद कुरेशी (वय २८) याला अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्या संदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलिसांनी केली.
