पोलिसांची मध्यरात्री मोठी धाड ! 

४८ किलो गांजा जप्त, दोघांना अटक

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – 

नेवासा तालुक्यातील वाकडी शिवारात पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत गांजा विक्रीचा मोठा काळा धंदा उघडकीस आणला आहे. राहत्या घराजवळील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेला तब्बल ४ लाख ७८ हजार ६० रुपये किमतीचा ४७.८२८ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला असून दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, २४ जुलैच्या मध्यरात्री १:५० च्या सुमारास वाकडी शिवारात गुंगीकारक अमली पदार्थांची खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रताप दराडे यांना मिळाली होती. माहिती मिळताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या उपस्थितीत पोलिसांनी वाकडी येथील महादेव पंडित जवदे याच्या शेतातील पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री छापा टाकला.

शेडची कसून पाहणी केली असता तेथे लपवून ठेवलेल्या तीन वेगवेगळ्या गोण्यांमध्ये गांजा आढळून आला:

 पिवळी गोणी: १५.८४२ किलो (किंमत ₹१,५८,४२०)

 पांढरी गोणी: १३.१०- किलो (किंमत ₹१,३१,०००)

 हिरवी गोणी: १८.८८६ किलो (किंमत ₹१,८८,६४०)

 एकूण जप्ती: ४७.८२८ किलो गांजा (एकूण किंमत ₹४,७८,०६०)

बेकायदेशीरपणे गांजाची साठवणूक करून विक्रीच्या तयारीत असणारे आरोपी:

१. महादेव पंडित जवदे (वय ३८ वर्षे, रा. वाकडी)

२. शुभम बाबासाहेब काळे (वय २९ वर्षे, रा. वाकडी)

या दोघांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. पोलीस अंमलदार शहाजी बाबासाहेब आंधळे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायदा कलम २० व २२ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ६३४/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करायची असल्याने आणि कोणतीही अनहुत घटना घडू नये यासाठी पोलिसांनी पूर्वकाळजी म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

ही धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि अमोल पवार, पोसई मनोज अहिरे, पोलीस अंमलदार शहाजी आंधळे, रवी शेळके, अजय साठे, अमोल डमाळे, हरी गायतडक, संदीप ढाकणे, सुमित करंजकर, नवनाथ शेकडे, गणेश फाटक, राहुल गायकवाड, चालक खंडागळे मेजर, महिला पोलीस अंमलदार वर्षा कांबळे व होमगार्ड पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!