थोरात संगीत महाविद्यालयाच्या अभंगवारीत संगमनेरकर मंत्रमुग्ध
आषाढी वारी ही समता, मानवता आणि भक्तीचा अखंड सोहळा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर (प्रतिनिधी) :
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अवघाची रंग एक झाला’ या अभंग व भक्तिगीतांच्या सुरेल कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महाविद्यालयातील ४० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकसुरात सादर केलेल्या अभंगांनी उपस्थित भाविक व रसिक मंत्रमुग्ध झाले. विठ्ठलनामाच्या गजरात रंगलेल्या या कार्यक्रमाने आषाढी वारीचा आध्यात्मिक उत्सव संगमनेरकरांना अनुभवता आला.
यावेळी बोलताना राज्याचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, “आषाढी वारी ही शेकडो वर्षांची परंपरा असून ती समता, बंधुता आणि मानवतेचे जिवंत प्रतीक आहे. जात, धर्म, पंथ यांचे भेद विसरून लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालत पंढरपूरकडे जातात. संतांच्या साहित्याने समाजाला मानवतेचा, प्रेमाचा आणि समतेचा संदेश दिला असून हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे.”

के. बी. दादा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, सह्याद्री संस्थेचे सहसचिव प्रा. बाबा खरात, प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, सुरेश परदेशी, अनिल देशपांडे, डॉ. वाकचौरे, इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली चोपडे, डॉ. त्रिंबक राजदेव, इतिहास अभ्यासक प्रा. शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संगीत महाविद्यालयाचे संचालक ह.भ.प. प्रा. विनोद राऊत यांनी सादर केलेल्या “भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल” या अभंगाने झाली. त्यानंतर “आवडे हे रूप गोजिरे स्वरूप”, “पांडुरंग पांडुरंग”, “सुखाचे जे सुख चंद्रभागे तिरी”, “नामदेव कीर्तन करी प्रेमभरे नाचे पांडुरंग” यांसह अनेक गाजलेल्या अभंगांनी सभागृह भक्तिमय झाले. इतिहास अभ्यासक प्रा. विठ्ठल शेवाळे यांच्या रसाळ निवेदनाने कार्यक्रमाची रंगत अधिक खुलली.

स्वप्नाली राऊत व गार्गी राऊत यांनी सादर केलेल्या अभंगांनाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सत्यजित सराफ, प्रताप राऊत, गणेश गोरडे, सौरभ रणधीर, वैभव पवार, अवधूत काळे आणि नानासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या सुरेल संगीतसाथीमुळे कार्यक्रम अधिक श्रवणीय झाला.
यावेळी डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, “संगीतामध्ये माणसाला सकारात्मक विचार देण्याची विलक्षण ताकद आहे. अध्यात्म आणि संगीत यांचा संगम मनाला शांतता देतो. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून आयोजित हा अभंगवारीचा कार्यक्रम संगमनेरच्या रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.”

कार्यक्रमाची सांगता प्रा. विनोद राऊत यांनी सादर केलेल्या “तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल” या सामूहिक अभंगाने झाली. त्यानंतर स्वप्नाली राऊत यांनी गायलेल्या “अवघा रंग एक झाला” या संत सोयराबाईंच्या अभंगाने उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब भिजवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुर्गाताई तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर आभार डॉ. जयश्री थोरात यांनी मानले.

४० विद्यार्थ्यांच्या सुरेल अभंगवाणीने खुलला भक्तिसोहळा
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात संगीत महाविद्यालयाच्या ४० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामूहिकरित्या सादर केलेल्या अभंगांनी संपूर्ण सभागृह विठ्ठलमय झाले. प्रा. विठ्ठल शेवाळे यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने संतपरंपरेचा आध्यात्मिक वारसा रसिकांसमोर उलगडला, तर प्रा. विनोद राऊत यांच्या प्रभावी गायनाने कार्यक्रमाला विशेष उंची मिळाली. हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात रंगलेला हा अभंगोत्सव संगमनेरकरांसाठी आषाढी वारीची अविस्मरणीय आध्यात्मिक पर्वणी ठरला.
