माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा

कारगिल विजय दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नी व समाजभूषण पुरस्कारांचा गौरव

संगमनेर | प्रतिनिधी |

कारगिल विजय दिनानिमित्त संगमनेर येथे आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माजी सैनिकांच्या स्मारकासाठी महत्त्वाची घोषणा केली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वेल्हाळे परिसरातील ४२ गुंठे जागा स्वराज्य सैनिक कल्याण समितीला देण्यात येणार असून, या ठिकाणी राज्यातील आदर्श सैनिक स्मारक उभारण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मालपाणी लॉन्स येथे स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नी व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रामहरी कातोरे, मेजर भाऊसाहेब पोखरकर, तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर, कॅप्टन सुभाष कुडेकर, सुनील थोरात, प्रा. बाबा खरात, किसनभाऊ हासे, जितेश लोढा, युवराज गांजवे, रोहिणी कोटकर यांच्यासह स्वराज्य सैनिक कल्याण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारगिल विजय हा भारतीय सैन्याच्या शौर्य, धैर्य आणि बलिदानाचा सुवर्ण अध्याय आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी दाखविलेल्या पराक्रमामुळे देशाचा मान उंचावला. सीमेवर दिवस-रात्र पहारा देणाऱ्या सैनिकांमुळेच देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगत आहेत. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने सैनिकांप्रती कृतज्ञता आणि अभिमान बाळगला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिले व दुसरे महायुद्ध तसेच स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान आणि चीनविरुद्ध झालेल्या युद्धांमध्ये भारतीय सैनिकांनी गाजविलेल्या शौर्याचा उल्लेख करत त्यांनी व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेवराव जाधव यांच्या स्मारकासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या स्वराज्य सैनिक कल्याण समितीचे कौतुक केले. या स्मारकासाठी कारखान्याची ४२ गुंठे जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी भारतीय सैन्याच्या योगदानाचा गौरव करत सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगितले. सैनिक कल्याणासाठी कार्य करणाऱ्या समितीला जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात भानुदास पोखरकर, प्रा. बाबा खरात आणि कॅप्टन सुभाष कुडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र जोशी यांनी केले, तर आभार सुनील थोरात यांनी मानले.

कारगिल विजय दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मालपाणी लॉन्सपर्यंत भव्य रॅली काढली. “वंदे मातरम्” आणि “जय जवान, जय किसान”च्या घोषणांनी परिसर देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला. यावेळी तालुक्यातील सैनिकांचे कुटुंबीय, महिला, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजभूषण पुरस्कारासह वीरमाता-वीरपत्नींचा सन्मान

डोंगरगाव येथील हरिभाऊ उगले यांना संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांना मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी वीरपत्नी वैशाली बडे, वर्षा घोडेकर, सुरेखा पवार, मनीषा गुंजाळ, मंगल वलटे, सिंधुताई मनसुख तसेच वीरमाता लहानुबाई ढगे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!