अमली पदार्थांविरोधात पोलिसांची जनजागृती मोहीम ; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणाईला वाचवून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त करत अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुरुवारी भव्य अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले. ‘एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य – व्यसनमुक्त जिल्ह्याकडे सामूहिक पाऊल’ या संकल्पनेवर आधारित या अभियानात शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या अभियानाचे उद्घाटन विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘व्यसनाला नाही, स्वप्नांना होकार द्या’ – प्रा. राम शिंदे

तरुणांची ऊर्जा, बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व हे राष्ट्राच्या प्रगतीचे आधारस्तंभ असल्याचे सांगताना प्रा. राम शिंदे म्हणाले, अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे अनेक तरुणांचे शिक्षण, करिअर, आरोग्य आणि कुटुंबीयांचे आयुष्य धोक्यात येत आहे. त्यामुळे तरुणांनी व्यसनाच्या नाही, तर आपल्या स्वप्नांच्या मागे धावावे. तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘तरुणांनी भविष्य घडवावे’ – डॉ. विखे पाटील

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘नशामुक्त भारत’ संकल्पनेचा उल्लेख करत राज्यात जनजागृतीला गती दिली जात असल्याचे सांगितले. व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजाचे मोठे नुकसान होत असल्याने तरुणांनी शिक्षण, कौशल्य, क्रीडा, उद्योग आणि समाजसेवा यांसारख्या सकारात्मक क्षेत्रात स्वतःला घडविण्याचा निर्धार करावा, असे त्यांनी आवाहन केले.

अभियानाचे सर्वत्र कौतुक

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी जिल्हा पोलीस दलाच्या उपक्रमाचे कौतुक करत या अभियानामुळे व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती होईल, असा विश्वास व्यक्त केला. आमदार काशिनाथ दाते यांनी व्यसनाला समाजाला लागलेली किड संबोधत तरुणांनी निश्चित ध्येय ठेवून त्यादिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.

सोशल मीडियाचा वापर विकासासाठी करा

प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तरुणांनी सोशल मीडियाचा वापर केवळ स्वतःच्या विकासासाठी करावा आणि अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!