तारुण्याला स्वयंशिस्तीची जोड द्या ; व्यसनांपासून दूर रहा : पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे
संगमनेर | प्रतिनिधी –
“तारुण्य हा वादळी वाऱ्याचा काळ आहे. या वयात मोठी स्वप्ने पाहण्याची, ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची आणि स्वतःला घडविण्याची ऊर्जा असते. मात्र या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक आहे. व्यसनाची सुरुवात अनेकदा कुतूहलातून होते; पण त्याचे परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनापासून कटाक्षाने दूर राहून शिक्षण, ध्येय आणि स्वप्नांना प्राधान्य द्यावे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी केले.
संगमनेर येथील श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शालेय समिती सदस्य प्रा. दिलीप सांगळे, पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, प्रा. आप्पासाहेब थिटमे आणि प्रा. सारिका शिंदे उपस्थित होते.

डॉ. सोनवणे म्हणाले की, १६ ते २५ वर्षांचा काळ हा आयुष्याला दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या वयात घेतलेले निर्णय भविष्यातील यश-अपयश ठरवतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून वेळ वाया घालवल्यास भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानामुळे रोजगार क्षेत्रात मोठे बदल होत असून वाढत्या स्पर्धेचा विचार करून विद्यार्थ्यांनी करिअरबाबत अधिक गंभीर राहणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. “अल्पवयात केलेल्या चुकीची शिक्षा अनेकदा स्वतःपेक्षा आई-वडिलांना भोगावी लागते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्यसनाधीनतेच्या धोक्याविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी मित्रांच्या दबावाला बळी न पडण्याचा सल्ला दिला. “सिगारेट, तंबाखू, गुटखा, दारू किंवा इतर कोणतेही व्यसन सुरुवातीला क्षुल्लक वाटते; पण ते आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि भवितव्य उद्ध्वस्त करू शकते. ‘एकदा करून पाहू’ हा विचारही टाळा,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मोबाईलचा वापर मर्यादित आणि विधायक पद्धतीने करण्याचे आवाहन करत त्यांनी, “मोबाईल हे साधन आहे, आयुष्याचा मालक नाही. त्याचा उपयोग ज्ञान मिळविण्यासाठी करा; अनावश्यक वापरामुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका,” असे सांगितले.
मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वाचनाची सवय अत्यावश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके वाचण्याचे आवाहन केले. वाचनामुळे विचार समृद्ध होतात, ज्ञान वाढते आणि एकाग्रता विकसित होते, असे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमित वाचन अनिवार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तारुण्यातील भावनिक आणि हार्मोनल बदल स्वाभाविक असले तरी त्यावर नियंत्रण ठेवून शिक्षण, करिअर आणि जीवनातील ध्येयांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ यांनी केले. प्रा. आप्पासाहेब थिटमे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. मनोहर राठोड यांनी केले, तर आभार प्रा. सारिका शिंदे यांनी मानले.
