भंडारदरा धरण ‘शताब्दी वर्षात’ जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा त्वरित सादर करण्याचे निर्देश

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  —

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे हे शताब्दी वर्ष केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता, या निमित्ताने हे धरण शाश्वत व जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले पाहिजे. यासाठी जुन्या वास्तूंचे जतन, वॉटर टुरिझम व स्थानिकांना रोजगार देणारा सर्वसमावेशक पर्यटन विकास आराखडा त्वरित सादर करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त करावयाच्या उपाययोजना व पर्यटन विकास आराखड्याचा आढावा घेण्यासाठी निळवंडे धरण विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, माजी सभापती मारुती मेंगाळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे व सोनल शहाणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, २०२६ पासून धरणाचे १०० वे वर्ष सुरू होत आहे. त्यादृष्टीने ‘डॅम रिहॅबिलिटेशन इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट’ (DRIP) अंतर्गत निधी व राज्य शासनाचा विशेष निधी वापरून कामे केली जातील. या महोत्सवाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जलसंपदा विभाग, वन विभाग व एमटीडीसी यांनी समन्वय साधून १५ दिवसांत अंतिम ‘मास्टर प्लॅन’ तयार करावा, जेणेकरून त्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांकडे करता येईल.

काय आहेत प्रमुख आकर्षणे व योजना:

🔹लेझर शो आणि डॉक्युमेंटरी : पर्यटकांच्या आकर्षणासाठी धरणाच्या भिंतीवर इतिहासाचा उलगडा करणारा भव्य ‘लेझर शो’ व डिजिटल डॉक्युमेंटरी दाखवली जाईल. तसेच, हा शो पाहण्यासाठी नैसर्गिक पद्धतीचे ॲम्फीथिएटर विकसित केले जाईल.

🔹वॉटर टुरिझम आणि अम्ब्रेला फॉल : पाण्याचा पुनर्वापर करून सुट्टीच्या दिवशी ‘अम्ब्रेला फॉल’ सुरू ठेवण्याचे नियोजन करावे. तसेच, अधिकृत ‘बोटिंग क्लब’ स्थापन करून लाईफ जॅकेट वापरणे सक्तीचे करावे आणि रेस्क्यू बोटची उपलब्धता अनिवार्य करावी.

🔹चित्रपट आठवणी व निसर्ग : या परिसरात चित्रीकरण झालेल्या जुन्या चित्रपटांच्या आठवणी जागवण्यासाठी विशेष म्युझियम, जुन्या नकाशांचे प्रदर्शन आणि शताब्दी स्मृती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल.

स्थानिकांना रोजगार जलसंपदा विभागाने धरण परिसरातील अतिक्रमण हटवून सुमारे १७ ते १८ हेक्टर जागा उपलब्ध केली आहे. या जागेवर पर्यटनाचे प्रकल्प उभारले जातील. प्रदूषण टाळण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालून इलेक्ट्रिक बस किंवा गोल्फ कार्ट्सची सुविधा सुरू केल्यास स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. तसेच, आदिवासी भागातील उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ, गाईड व्यवसाय आणि रिसॉर्ट्सच्या माध्यमातून स्थानिकांना संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण असल्याचे श्री. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड आणि रतनगड या परिसरातील ट्रेकिंग पॉईंट्सवरही पर्यटकांना सुविधा पुरवण्याबाबत विचार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!