साकळाई पाणी योजनेच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील गावे दुष्काळमुक्त करणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

सारोळा कासार येथे सुमारे ३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण संपन्न

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर 

साकळाई पाणी योजनेच्या कामाची सुरुवात येत्या पंधरा दिवसात करण्यात येईल. या पाणी योजनेच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील गावांना दुष्काळमुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

​अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार येथे सुमारे ३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. ​या कार्यक्रमास दिलीप भालसिंग, उद्योजक दिलीप दाते, सरपंच सौ. आरती कडूस, रविंद्र कडूस, सौ. योगिता निंभोरे, किरण साळवे, संतोष खोबरे, दादाभाऊ चितळकर, रंगनाथ निमसे आदी उपस्थित होते.

​पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “या भागातील लोकांना अनेक वर्षे पाण्याची प्रतीक्षा करावी लागली. साकळाईच्या सर्व कामांना शासनाने मंजुरी दिली असून, पुढील पंधरा दिवसांत कामाला सुरुवात करण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. साकळाईच्या कामामुळे सारोळा कासार येथील २९५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन १३ बंधाऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.”

​केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला निधी उपलब्ध होत असून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाचे नियोजन करताना रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ विविध समाजघटकांना मिळत आहे. सुरू केलेली एकही योजना बंद नाही. कोविडनंतर सुरू झालेल्या मोफत धान्य योजनेची मुदत वाढविण्यात आली असून, ‘लाडकी बहीण’ योजनाही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

​ते पुढे म्हणाले, “कुकडी कालव्याच्या कामांना ४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, कालव्याची कामे मार्गी लागल्यानंतर आवर्तनाचा चाळीस दिवसांचा कालावधी कमी होईल. शेवटच्या गावाला पाणी मिळावे म्हणून पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा विचार जलसंपदा विभाग करीत आहे. ​जिल्ह्यात रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येत असलेल्या गुंतवणुकीचा फायदा जिल्ह्याला कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संरक्षण उत्पादनाचे केंद्र म्हणून आपला जिल्हा नावारूपाला येईल. दळणवळणाची साधने उपलब्ध होत आहेत. छत्रपती संभाजीनगर – पुणे ग्रीन फिल्ड मार्ग होत आहे. जिल्हा मोठ्या औद्योगिक नगरांना जोडला जात असल्याने, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचे काम युवकांच्या भवितव्याच्या दृष्टीने करायचे आहे.” असेही त्यांनी सांगितले.

​घोसपुरी येथे माजी सैनिकांनी उभारलेल्या कमानीचे लोकार्पणही मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सैनिकांच्या त्यागाला समाज विसरून जातो, अशी खंत व्यक्त करून ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना असली पाहिजे, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, अकोला जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या स्मारकाप्रमाणे आपल्या जिल्ह्यातही स्मारक उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!