शहराच्या व तालुक्याच्या हितासाठी वाईट प्रवृत्ती रोखा — माजी मंत्री बाळासाहेब थोरात
अमृतवाहिनी सह.बँकेची 1130 कोटींची उलाढाल —
संगमनेर टाइम्स नेटवर्क —
आपण अनेक अडचणीवर मात करून निळवंडे धरण पूर्ण केले या धरणामुळे पुढील अनेक पिढ्या समृद्ध होणार आहे. धरणातून शहरासाठी थेट पाईपलाईन योजना आली. विकासाची कामे केली या पाठीमागे कोणीतरी राबतो आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. सहकारी संस्थांमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था बळकट झाली असून अमृतवाहिनी बँकेने 1130 कोटींची उलाढाल केली आहे. ही सर्व वाटचाल जपण्याची आपली जबाबदारी असून तालुक्यात वाढलेल्या व येऊ पाहणाऱ्या वाईट प्रवृत्ती वेळीच रोखा असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर खुर्द येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व शेतकरी बोलत होते अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर चेअरमन सुधाकर जोशी, संभाजी रोहकले, ॲड. माधवराव कानवडे, लहान भाऊ गुंजाळ, पांडुरंग घुले, डॉ.जयश्री थोरात, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, बापूसाहेब टाक, रामदास वाघ, गणपतराव सांगळे, विष्णुपंत रहाटळ, ॲड. नानासाहेब शिंदे, उपसरपंच गणेश सुपेकर, अर्चनाताई बालोडे, रोहिणी गुंजाळ, सुभाष गुंजाळ, ॲड. लक्ष्मण खेमनर, अण्णासाहेब शिंदे, राजू गुंजाळ, बापूसाहेब गिरी, ललिता दिघे, विवेक तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, बँकिंग व पतसंस्था हा विभाग अत्यंत अवघड असून बँकेने 1130 कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. संगमनेर तालुक्यात बँका व पतसंस्थांचे मोठे जाळे असून याबद्दल सुमारे 9000 कोटींच्या ठेवी आहेत हे तालुक्याच्या आर्थिक समृद्धीचे लक्षण आहे. हे सर्वांच्या कष्टाचे फळ आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नसतील एवढ्या ठेवी आपल्या तालुक्यात आहे. ही बळकट अर्थव्यवस्था सहकारी संस्थांमुळे आहे. कारखाना, दूध संघ, बाजार समिती शैक्षणिक संस्था सर्व उच्च गुणवत्तेचे आहे.

हा तालुका आपण एक परिवाराप्रमाणे चाळीस वर्षे जपला. मात्र आता मागील एक वर्षांमध्ये तालुक्यामध्ये अस्वस्थता वाढली आहे. पोलीस स्टेशन मध्ये मारामाऱ्या होत आहे पीआय सुरक्षित नाही तेथे सामान्य जनतेचे काय, अमली पदार्थांचा माफीया संगमनेरच्या बस स्थानकासमोर येऊन भाषण करतो आहे हे काय सुरू आहे.
नाशिक पुणे रेल्वे साठी आपण सातत्याने पाठपुरावा केला .जमीन अधिग्रहित केल्या. चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात सुद्धा आले आणि सत्ता बदलल्यानंतर संगमनेर तालुक्याची रेल्वे पळवली. तालुका एक संघ ठेवायचा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नसून वाईट प्रवृत्तींना रोखण्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले

डॉ. तांबे म्हणाले की, संगमनेरच्या सहकार हा राज्याला दिशादर्शक आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित अनेक ऐतिहासिक निर्णय झाले आहे. विरोधक मात्र सतत खोटे बोलत राहतात त्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी संगमनेर खुर्द परिसरातील नागरिक कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्हा. चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे यांनी केले
