सहकारी संस्थांमुळे तालुक्यात आर्थिक समृद्धी — माजीमंत्री बाळासाहेब थोरात
अमृत उद्योग समूहासह थोरात कारखान्यात लक्ष्मीपूजन
प्रतिनिधी —
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दिलेल्या आदर्श तत्वांवर संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू आहे. तालुक्यातील सहकारी व त्यांच्या संलग्न संस्थांच्या माध्यमातून सभासद शेतकरी उत्पादक कामगार या सर्वांच्या जीवनामध्ये मोठा आनंद निर्माण झाला असून सहकारामुळे तालुक्याच्या जीवनात समृद्धी आली आहे. थोरात कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला असून नवीन उभी राहिलेली अद्यावत इमारत ही अत्यंत सुंदर वैभवशाली असल्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

दीपावलीनिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये लक्ष्मीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत ॲड. माधवराव कानवडे, व्हा.चेअरमन पांडुरंग पा.घुले, कांचनताई थोरात, रणजितसिंह देशमुख, युवा नेते राजवर्धन थोरात, डॉ.जयश्री थोरात, डॉ.हसमुख जैन, सवी पारीख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सुधाकर जोशी, ॲड.नानासाहेब शिंदे, अजय फटांगरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, तालुक्यातील नागरिकांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण व्हावी याकरता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 1968 मध्ये या कारखान्याची उभारणी केली. वीट, माती आणि पत्र्यांपासून झालेल्या या इमारतीमध्ये अनेक वर्ष कामकाज सुरू होते. 800 मे.टन पासून कारखाना सुरू झाला. नव्याने 5500 मे टन क्षमतेचा कारखाना राज्यासाठी पॅटर्न ठरला आहे. सहकारी संस्थांमुळे नागरिकांच्या जीवनात समृद्धी आली आहे. खेडोपाडी, गावोगावी कष्टातून शेतकऱ्यांनी आता बंगले बांधले आहेत.ही समृद्धी आहे. याचबरोबर तालुक्यातील शिखर संस्थांनी चांगले कामकाज करताना या नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. तालुक्याच्या प्रगतीसाठी आपण कायम केले असून एकेक माणूस जोडला आहे. कारखान्याची नवीन वैभवशाली इमारती अत्यंत सुंदर व शहराच्या वैभवात भर टाकणारी आहे.

जीवनामध्ये कष्ट,धावपळ दुःख कायम असते मात्र दीपावलीच्या काळामध्ये हे सर्व विसरून आनंदाने राहायचे असते सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करायचा असतो दिवाळी हा आनंदाचा कालखंड असून ही दिवाळी सर्वांना आनंदाची जावो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

तर डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी संस्थांनी नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. 85 हजार स्क्वेअर फुटाचे हे नवीन ऑफिस अत्यंत वैभवशाली असून देशांमध्ये इतर कारखान्यासाठी आदर्शवत ठरणारे आहे. तर राजवर्धन थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे ग्रेट आर्किटेक्चर होते त्यांनी सहकार सहकारातील इमारतींबरोबर माणसे देखील उभी केली असल्याचे गौरवोउद्गार त्यांनी काढले.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालक त्याचप्रमाणे अकाउंट विभागाची अमोल दिघे संदीप दिघे किरण कानवडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले.

सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिवाळी भेट द्यावी
निवडणुकीपूर्वी सत्तेवर येण्यासाठी राज्यातील सरकारने संपूर्ण कर्जमाफीची आश्वासन दिले होते. राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली. पिके वाहून गेली. या शेतकऱ्यांना आता खरी मदतीची गरज आहे. शेतकरी पूर्ण अडचणीत आहे. अशा वेळी सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून दिवाळी भेट दिली पाहिजे. दिवाळीला आम्ही काहीतरी करू असे सांगितले आहे मात्र अद्याप कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नसून शेतकऱ्यांसाठी ही काळी दिवाळी ठरली आहे. त्यामुळे तातडीने कर्जमाफी करावी अशी मागणी मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली
सर्व सहकारी संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कारखाना,राजहंस दूध संघ,अमृतवाहिनी बँक,जिल्हा सहकारी बँक,राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी यांसह विविध सहकारी संस्थांमध्ये लक्ष्मीपूजन करण्यात आले यावेळी भजनांचा संगीत कार्यक्रम संपन्न झाला.
