प्रवरा कारखाना शेतकरी कामगारांची काळी दिवाळी..!

ऐन दिवाळीत उसाचे पेमेंट न करणाऱ्या विखे पिता पुत्रांचा प्रवरा शेतकरी मंडळाच्या वतीने जाहीर निषेध

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे वर्चस्व असणाऱ्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिवाळीत शेतकरी कामगारांना उसाचे पेमेंट मिळाले नसल्याचा आरोप करीत विखे पिता पुत्रांचा निषेध करण्यात आला आहे यासंदर्भात प्रवरा शेतकरी मंडळाच्या वतीने एकनाथ घोगरे पाटील मु. लोणी खु ll, बाळासाहेब विखे पाटील लोणी बु ll, अरुण कडू पाटील सात्रळ ता. राहुरी यांच्या वतीने एक निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

संपूर्ण निवेदन खालील प्रमाणे आहे… 

1) ‘ देख के दुनिया की दिवाली,दिल मेरा चुपचाप रोया ‘ बऱ्याच जणांना चित्रपटातील हे दर्दभरे गाणे आठवत असणारच ? आज खरोखरीच प्रवरेच्या शेतकऱ्यांना आठवणारच हे गाणे. आणि या आठवणीतून त्यांच्या दबलेल्या भावना तशाच दबलेल्या आहेत. दिवाळीचा काळ म्हणजे ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने व आनंद आणणारा सण असेच म्हणावे लागेल.अतिवृष्टी मुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे.आज दीपावलीच्या निमित्ताने चहू बाजूने बातम्या येत आहेत.कुणा कारखान्याने शेतकऱ्याच्या बँक खात्यावर 32 कोटी,कुणा दूध संघाने 16 कोटी, कुठल्या खाजगी दूध संस्थेने कोटी कोटी बँकेत वर्ग केले. या व अशाच प्रकारच्या बातम्या आज प्रवरा परिसरातील शेतकरी फक्त ऐकतो आणि वाचतो आहे. मात्र आज अखेरीपर्यंत दीपावलीच्या पहाट पर्यंत त्याच्या खात्यावर मागील वर्षाच्या उसाचे कबूल केलेले प्रति टन तीनशे पेमेंट सुद्धा अद्यापही जमा झाले नाही.

2) अगदीच कोणाला उल्लेखच करायचा असेल तर प्रवरा कारखान्याने फक्त आणि फक्त व्याजाचे तुटपुंजे पेमेंट जमा केलेले आहे. हे पेमेंट सुद्धा अत्यल्प म्हणावे असेच आहे. त्याचे कारण ज्यांचे शेअर्स अपूर्ण आहेत त्यांना व्याजच नाही त्यांचे व्याज परस्पर शेअर्स खाते जमा होते. आणि शेअर्स पूर्ण झालेले शेतकरी संख्येने खूपच कमी आहेत. हे व्याजाचे पेमेंट अगदी सर्व मिळून काही लाखांमध्ये मोजता येईल इतकेच आहे. त्यात व्याजाचे पेमेंट मिळालेले हे शेतकरी कुटुंबे खूप म्हणजे खूपच कमी आहेत. तेव्हा ही व्याजाचे पेमेंट परिसरात मिळाले काय न मिळाले काय ते नगण्यच आहे.

3) कामगारांचे संदर्भातील बोनस हाही परिसरात नगण्य स्वरूपातच गणला जात आहे. त्याचे स्वरूप अगदी शेळीच्या शेपटा सारखेच आहे.ते ना माशा वारते ना अब्रू झाकते! कारण प्रवरेचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर कारखान्यात कायमस्वरूपी कामगार खूपच कमी आहेत. बाकी सर्व कंत्राटी मजूर पाच पंचवीस वर्षांपासूनचे आहेत अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांना 20% बोनस खूप थोड्या कुटुंबात हा अल्पस्वल्प पैसा जाणार आहे. त्यातही कामगारांचे काही महिन्यांचे पगारही थकीत आहेत.आणि म्हणून आजूबाजूच्या भागातील शेतकऱ्यांना व कामगारांना मिळालेल्या कोटी कोटी रुपयांचे पेमेंट मिळालेले आहेत आणि म्हणूनच ‘ देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप रोया ‘असेच म्हणण्याची पाळी शेतकरी व कामगारांवर आलेली आहे.

4) प्रवरेच्या शेतकरी व कामगारांच्या भळ भळत्या जखमांवर, दुःखावर आणखी डागण्या दिल्या, त्यावर अजून मीठ चोळले ते त्या महाशिवपुराण कथेने आणि केंद्रात गृह व सहकार खाते सांभाळणारे अमित शहा यांच्या कार्यक्रमाने. या कार्यक्रमाची कोटी कोटी ची उड्डाणे पाहिली तर थक्क व्हायच्या ऐवजी मन चिडून उठते. तो महाराज पुराण कथा वाचायला आला की , विखेंची स्तुती सांगतोय ? त्यासाठी त्याला कोट्यावधी रुपये फी ऐकायला मिळते. वरून परत त्याला तब्बल चार पाच कोटींची गाडी दक्षिणा म्हणूनही दिली. तीन-तीन मंडपांचा खर्च जेवणाचा आणि हजार भर प्रवासी बसेसचा आणि इतर नियोजनाचा खर्च त्याचे काय वर्णन करावे ? अशा पद्धतीने हे शिव पुराण 15 कोटी च होतं की 17 कोटीच याचा हिशोब अजून लागायचा आहे. परंतु ही सर्व कोटी आणि कोटी चे आकडे फक्त ऐकतच राहायचे अशी दुर्दैवी वेळ प्रवरेच्या कामगार व शेतकऱ्यांवर आलेली आहे.

5) केंद्रीय मंत्री अमित शहांची सभा अशीच भव्य दिव्य आणि कोटी कोटींचा चुराडा करणारी होती. ते आले बाप बेट्यांच्या बाप लेकांच्या पुतळ्यांचे उद्घाटन करायला पण परिसराला भुर्दंड बसला तो तब्बल चार सहा कोटी रुपयांचा. तो मांडव, त्याचा भव्यपणा, त्याचं वॉटरप्रूफिंग, सभेला येण्यासाठीचे ची नियोजन केले गेले. जेवणावेळी वेगळ्याच. या सर्वांसाठी कोटींचा चुराडा झाला. हे सर्व कोटी कोटींचे आकडे ऐकून मनात चीड आली नाही तर नवलच समजावे. या पार्श्वभूमीवर आज प्रवरेचा शेतकरी हे सर्व उघड्या डोळ्याने पाहतो आहे. कोणाला वाटत असेल हे शिवपुराण आणि हे अमित भाईंचे पुराण याच्यातून आम्हाला काही लाभ होईल. परंतु ती आशा आता संपुष्टात आली आहे. दिवाळीच्या या काळात ते फक्त स्वप्नच ठरणार आहे अशी दुर्दैवी वेळ आलेली आहे.

6) एक काळ असा होता की प्रवरेच्या शेतकऱ्याला दीपावलीच्या काळात व्याज आणि खोडकी वाढ्याचे पेमेंट म्हणून कारखान्या कडून पैसे मिळायचे. खऱ्या अर्थाने त्यांची दिवाळी व्हायची. आज तो फक्त इतिहासच राहिलेला आहे. शिव पुराण आणि अमित भाई पुराण याच्यासाठी जे 20- 22 कोटी रुपये खर्च झाले ते जनसेवा मंडळाचे असे उघड उघड दिसते.किंबहुना या कार्यक्रमांचे प्रायोजक, आयोजक तेच होते. याच जनसेवा मंडळाने काही रुपये कारखान्याला दान दिले असते तर शेतकऱ्यांची दिवाळी काळी झालीच नसती! तसेही कारखान्याला जनसेवा मंडळाकडून पैसे घेण्याची मुळी आवश्यकताच नाही. कारखान्याला केंद्र शासनाकडून मिळालेले चारशे कोटी रुपये अजूनही मोठ्या प्रमाणावर अखर्चित आहेत हे कारखान्याच्या वार्षिक अहवालावरून कळतेच आहे. त्यातला काही वाटा शेतकरी कामगारांना दिला असता तर किती चांगले झाले असते. मात्र कामगार शेतकऱ्यांचे भले व्हावे असे विखे घराण्याला कधी वाटलेच नाही. त्यांच्या चार पिढ्या शेतकरी आणि कामगारांना झुलवण्यात आणि त्यांचे शोषण करण्यातच गेल्या. ज्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन होते त्यांनी नाही तरी एक कान मंत्र शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाच्या वेळी जाहीररीत्या पद्मभूषण यांनी सांगितलेला आहेच. शेतकऱ्याच्या हातात पैसा गेला तर ते माजतील हाच तो त्यांचा कानमंत्र! हा कानमंत्र अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या कानात शिसे ओतील असे वाटले नव्हते. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या विखे पिता पुत्रांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आमच्या निषेधाची चीड किंवा चाड त्यांना असेल तर त्यांनी अजूनही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे, व कबूल केलेले घामाचे पैसे द्यायलाच हवेत व शेतकरी कामगारांची दिवाळी आनंदी करावी.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!