महायुती सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका !

युरिया टंचाईने शेतकरी संतप्त ; नाशिक–पुणे महामार्गावर दीड तास ‘रास्ता रोको’

माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरातांच्या मध्यस्थीनंतर प्रशासन नमले ; बफर स्टॉकमधून युरिया वाटपाचा निर्णय

संगमनेर | विशेष प्रतिनिधी

खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया खताच्या तीव्र टंचाईमुळे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप सोमवारी रस्त्यावर उसळला. नाशिक–पुणे महामार्गावर हजारो शेतकऱ्यांनी सुमारे दीड तास ‘रास्ता रोको’ आंदोलन करत सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिस्थिती गंभीर होताच प्रशासनाने माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शासकीय बफर स्टॉकमधून तातडीने युरिया उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि आंदोलन मागे घेण्यात आले.

पहाटेपासून रांगा… तरीही युरिया नाही !

युरिया खताच्या टंचाईमुळे शेतकरी आणि महिला पहाटेपासून खत विक्री केंद्रांबाहेर रांगेत उभ्या होत्या. मात्र पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने संताप वाढत गेला. काही शेतकऱ्यांनी युरियासोबत इतर उत्पादने खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

थोरातांचा सरकारवर हल्लाबोल

आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी खत वितरण व्यवस्थेवर तीव्र टीका केली. “मी कृषिमंत्री असताना अशी अनागोंदी कधी पाहिली नव्हती. खतांचा तुटवडा, वाढलेल्या किमती आणि ‘लिंकिंग’च्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”

उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आणि अन्य अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी चर्चा केली. शासकीय बफर स्टॉकमधून युरिया उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

‘लिंकिंग’मुळे शेतकरी त्रस्त ?

– युरियासोबत इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप.

– खाजगी विक्री केंद्रांवर वशिलेबाजी होत असल्याची तक्रार.

– शासकीय बफर स्टॉकचे वाटप संगमनेर तालुका शेतकी संघामार्फत करावे, अशी मागणी.

युरिया वाटप सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, नियमित खतपुरवठा झाला नाही आणि कथित ‘लिंकिंग’ थांबले नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला.

– युरिया टंचाईमुळे शेतकरी रस्त्यावर

– नाशिक–पुणे महामार्ग दीड तास ठप्प

– बाळासाहेब थोरातांची प्रशासनाशी थेट चर्चा

– बफर स्टॉकमधून युरिया वाटपाचा निर्णय

– ‘लिंकिंग’विरोधात शेतकऱ्यांचा संताप कायम

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!