12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन
संगमनेर तालुक्यात गावोगावी प्रेरणा दिन साजरा होणार

संगमनेर | प्रतिनिधी —
थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारातील संत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 12 जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो. यावर्षीही गावोगावी मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन होणार आहे. तसेच अमृत उद्योग समूहाच्या वतीने सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वा. अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.

घुले म्हणाले की, स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून संगमनेर तालुक्यामध्ये समृद्धी निर्माण केली आहे. आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शकता ही त्रिसूत्री सहकारात राबवून संपूर्ण देशासाठी दिशादर्शक ठरणारे संगमनेर हे आदर्श सहकाराचे मॉडेल निर्माण केले आहे.

दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस संगमनेर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. दरवर्षी जयंती महोत्सव व प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृति पुरस्कार व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब स्मृती पुरस्कार देऊन राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात येते. याचबरोबर दिग्गज कलाकारांच्या उपस्थित मध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते.
हा पुरस्कार वितरण कार्यक्रम येत्या काही दिवसात होणार असून 12 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अमृत उद्योग समूहाच्या वतीने प्रेरणास्थळ अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात येणार आहे.


माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, बाजीराव पा.खेमनर,ॲड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.मैथिली तांबे, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, इंद्रजीत थोरात, सुधाकर जोशी, शंकरराव पा.खेमनर, हौशीराम सोनवणे, डॉ.जयश्री थोरात, राजेंद्र गुंजाळ, उत्कर्षा रुपवते, लक्ष्मणराव कुटे, सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, अर्चना बालोडे, सुरेश झावरे, हिरालाल पगडाल, उद्योगपती राजेश मालपाणी, प्रा.बाबा खरात, केशवराव जाधव, जगन्नाथ घुगरकर यांसह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी व संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या अभिवादन कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू – भगिनी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी विकास मंडळ व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

गावोगावी अभिवादन
12 जानेवारी निमित्त संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात दरवर्षी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी होत असून सकाळी प्रभात फेरी याचबरोबर अभिवादन विविध व्याख्याने, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, अशी उपक्रम राबवले जातात. यावर्षीही प्रत्येक गावामध्ये प्रेरणा दिनानिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे.
