छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी — प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे
सातारा / प्रतिनिधी —
“युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य समाजासाठी प्रेरणादायक आहे. राजमाता जिजाऊ आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी रयतेचे राज्य स्थापन केले. शौर्य, जिद्द, आत्मविश्वास, संघटन, मैत्री, विश्वास, व्यवहार चातुर्य, राजनीती, स्वातंत्र्य, स्वाभिमानाबरोबरच प्रखर राष्ट्रभक्तीचे दर्शन त्यांच्या जीवन कार्यातून होते म्हणून युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी,” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी केले आहे.
येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील सर्व विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. अनिल वावरे, उपप्राचार्य डॉ. रामराजे माने देशमुख, डॉ. आर. आर. साळुंखे, डॉ. शिवाजी पाटील डॉ. सविता मेनकुदळे प्रा. एकनाथ झावरे, डॉ. विद्या नावडकर, डॉ धनाजी मासाळ, डॉ. गणेश लोखंडे, कॅप्टन डॉ. केशव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी इतिहास विभाग प्रमुख डॉ. धनाजी मासाळ यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. मोरे पुढे म्हणाले की, ” रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज हे होते. म्हणूनच त्यांनी सातारा येथील महाविद्यालयाला आग्रहाने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले. समाजातील महापुरुषांचे कार्य दीपस्तंभासारखे असते. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी महामानवांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून स्वतःचे जीवन घडविले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले रयतेचे राज्य हे स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या लोकशाही मूल्यांवर आधारित होते. म्हणून लोकशाही बळकट व वृद्धिंगत करण्यासाठी समाजातील प्रत्येक सुजाण व सजग नागरिकाने त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करावा. तसेच महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबरच महामानवांच्या जीवन कार्याचा परिचय करून देऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजवावीत,” असेही त्यांनी सांगितले.

प्रा. डॉ. मनोहर निकम यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अधीक्षक तानाजी सपकाळ, डॉ. संदीप किर्दत, प्रा. तानाजी देवकुळे डॉ. बाबासाहेब कांगुणे, डॉ. वर्षा माने, प्रा. लोहार, डॉ. दत्तात्रय कोरडे, डॉ. कबीर वाघमारे, प्रा. डॉ. अभिजीत पोरे, डॉ. अभिमान निमसे, प्रा. विजया गणमुखी, प्रा.मनोज धावडे, डॉ महादेव चिंदे, डॉ. संजयकुमार सरगडे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी, कार्यालयीन सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
