उत्सव : नव्या पर्वाचा प्रारंभ !
1990 च्या दशकात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या संगमनेरच्या सांस्कृतिक चळवळीतील आघाडीची संस्था ‘उत्सव कला व क्रीडा अकादमी’ पुन्हा एकदा नव्या पर्वाचा प्रारंभ करत आहे. त्यानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शशिकांत माघाडे यांनी संस्थे संदर्भात लिहिलेला माहितीपर लेख…

मित्रांनो सप्रेम नमस्कार !
आपल्या सर्वांशी हा संवाद साधताना मनोमन आनंद होत आहे. काल आमच्या उत्सव अकादमीच्या पदग्रहण समारंभाची बातमी आपण वाचली असेलच. या बातमीवरून सांस्कृतिक चळवळीशी संबंध नसलेल्या नव्या पिढीच्या लोकांना फारशी कल्पना येणार नाही म्हणून हा संवाद साधण्याची गरज पडली.
१९९०-९१ च्या दशकात आम्ही महाविद्यालयीन तरुणांनी मिळून उत्सव अकादमीची स्थापना केली. संगमनेर तालुक्यातील युवकांना रचनात्मक सांस्कृतिक काम करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ मिळाले. सर्व जातीधर्माचे सुमारे ७०-८० युवक या चळवळीशी जोडले गेले होते. त्यावेळी देशातली राजकीय परिस्थिती देखील अस्थिर होती. युवकांना वेगळ्या मार्गाला नेणाऱ्या अनेक संघटना उदयास आल्या. रचनात्मक कामाऐवजी दिशाहीन कामासाठी युवकांना आकर्षित करण्यात आले. मात्र *उत्सव* ने युवकांना सांस्कृतिक चळवळीचा पर्याय दिला.

संगमनेर मध्ये संग्राम नाट्यसंस्था, नवनिर्माण नाट्यसंस्था आणि एमएसईबी चा नाट्यविभाग आणि इतर छोट्या मोठ्या संस्था ८०-९० च्या दशकात कार्यरत होत्या. डॉ. सोमनाथ मुटकुळे, दिवंगत चंद्रकांत पवार सर, जगदिश पिंगळे सर, सुर्यकांत शिंदे, वसंत बंदावणे, भाटे साहेब, पायमोडे साहेब आदी मान्यवरांनी नाट्यक्षेत्रात भरीव योगदान दिले. रणजित स्पोर्ट्स क्लब, सुप्रीम क्लब, सुपर डायमंड, एन्जॉय क्लब, सम्राट क्लब यासारख्या अनेक संस्थानी युवकांसाठी क्रिडा क्षेत्रात उत्तम योगदान दिले. अलीकडे जयहिंद युवा चळवळीचे काम मोठे आहे.
नाट्यक्षेत्रात डॉ. मुटकुळे नेटाने वैचारिक नाटकाच्या माध्यमातून बहुजनांचा विचार पुढे नेत आहेत. अलीकडच्या काळात संग्राम संस्थेबरोबरच डॉ. अमित शिंदे, अंतोन घोडके या उत्साही तरुणांनी राज्यनाट्य स्पर्धेत मोठ्या जिद्दीने आपला सहभाग नोंदवला.
सांस्कृतिक चळवळीची चर्चा करीत असताना संगमनेर महाविद्यालयाचे योगदान विसरता येणार नाही. प्राचार्य म. वि. कौंडिण्य हे मोठे कला रसिक आणि दूरदृष्टीचे प्राचार्य या महाविद्यालयाला लाभले होते. त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत नाट्यचळवळ सक्रिय राहिली. दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनात तीन अंकी नाटकातून अनेक कलावंत घडले. उत्सव च्या विद्यार्थी कलावंतांनी पुण्याची राज्यस्तरीय पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा जिंकली. १८ वर्षाच्या इतिहासात पुरुषोत्तम करंडक पुण्याच्या बाहेर नेण्याचा विक्रम उत्सव च्या कलावंत विद्यार्थ्यांनी घडविला. विशेष म्हणजे स्पर्धेतली सर्व पारितोषिकेही पटकावली. ‘आभास की भास’ या एकांकिकेने इतिहास घडवला. प्रा. गोसावी सर, प्रा. एम. एम. देशमुख, प्रा. रोहित कावळे आणि इतर प्राध्यापकांनी नाट्यविभाग समृद्ध केला.

हे सगळे होत असताना सांस्कृतिक चळवळी ज्या पद्धतीने पुढे जायला हव्यात त्या पद्धतीने जाऊ शकल्या नाहीत हे कटुसत्य आहे. व्यवस्थेसमोर अनेक प्रश्न असताना त्या प्रश्नांना भिडण्याऐवजी युवकांना उथळपणे मिरवणाऱ्या कार्यक्रमात सहभागी करून घेणाऱ्या संघटनांचे पेव फुटले. डीजे आणि मोबाईलच्या नादी लागलेल्या युवकांना अधिकाधिक दिशाहीन केले गेले. सोशल मीडियावर चमकोगिरी करणारे गुलछबु गल्लोगल्ली फिरू लागले. युवकांमधली आक्रमकता आणि तिला पोषक असे हिंसेला प्रोत्साहन देणारे घटक वाढले. आणि म्हणूनच युवकांना योग्य दिशा देणाऱ्या उत्सव अकादमीचे पुनरुज्जीवन करावे असा आग्रह अनेक मित्रांकडून झाला.
सांस्कृतिक चळवळीतूनच उद्याचे लेखक, कवी नाटककार, कलावंत घडणार आहेत. त्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हायला हवे. पुढील काळात “उत्सव” साहित्य, संगीत, नाटक आणि क्रिडा क्षेत्रात रचनात्मक काम करणार आहे. विवेकवादी, विज्ञानवादी, बुद्धिजीवी पिढी घडवण्यासाठी उत्सव प्रतिष्ठान कटिबद्ध असणार आहे. यासाठी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाची गरज आहे.
— प्रा. डॉ. शशिकांत माघाडे
