उत्सव कला व क्रिडा अकादमीचा शनिवारी पदग्रहण समारंभ !
संगमनेरच्या सांस्कृतिक चळवळीचे नवे पर्व सुरु..
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेरच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या उत्सव कला व क्रिडा अकादमीच्या पदग्रहण समारंभाचे शनिवारी१६ मे रोजी आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख राजेश माघाडे यांनी दिली आहे. या पदग्रहण सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री कलाभूषण रघुवीर खेडकर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार डॉ.सुधीर तांबे हे भूषविणार आहेत.

१९९० च्या दशकात संगमनेर शहरात काही होतकरू तरुणांनी मिळून उत्सव अकादमीची स्थापना केली होती. या संस्थेने बालकुमार चित्रकला स्पर्धा, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या. त्याचप्रमाणे अकादमीच्या युवा कलाकारांनी संगमनेर महाविद्यालयाच्या माध्यमातून पुणे येथील अतिशय प्रतिष्ठेचा आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक जिंकला. ‘आभास की भास’ या केदार शिंदे लिखित एकांकिकेने विविध राज्यस्तरीय स्पर्धेत पारितोषिके मिळवली.

त्यानंतर रंगभूमीवर व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून युवा कलावंतांना संधी दिली. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने विविध ठिकाणी गेलेल्या कलावंतांना पुन्हा एकत्र आणून युवा शक्तीला रचनात्मक सांस्कृतिक चळवळीकडे वळवण्यासाठी अकादमी काम करणार आहे. नव्या दमाच्या युवकांना कला व क्रिडा क्षेत्रात मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी शिक्षक- प्रशिक्षक मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणार आहेत.
या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख, नगरसेवक दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, किशोर टोकसे, योगेश (चिकू) जाजू, शैलेश कलंत्री, किशोर पवार, दानिश खान, नितीन अभंग, छात्र भारतीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिकेत घुले, संगमनेर वकील संघाच्या अध्यक्ष ॲड. मिनल देशमुख, ॲड. सुहास आहेर ॲड. नईम इनामदार इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम १६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता व्यापारी असोसिशन हॉल येथे होणार असून नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अकादमीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
