अक्षय्य तृतीयेला संगमनेरच्या लक्ष्मणबाबांचा यात्रोत्सव !

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेरच्या हजारो कुटुंबांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लक्ष्मणबाबांचा यात्रोत्सव रविवारी अक्षय्य तृतीयेला मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ब्रिटीश राजवटीच्या सुरुवातीच्या काळापासून चालत आलेल्या या परंपरेला यंदा पुन्हा एकदा लोकनाट्य तमाशा आणि कुस्त्यांच्या हगाम्याने नवा साज चढणार असून, मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या उत्सवासाठी संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणासह संपूर्ण परिसर सज्ज झाला आहे.

      साधारणतः ब्रिटीश राजवटीच्या सुरुवातीचा काळ श्री लक्ष्मणबाबांचा कार्यकाळ मानला जातो. भौगोलिकदृष्ट्या रामायण काळात संगमनेरचा हा संपूर्ण परिसर ‘दंडकारण्य’ म्हणून ओळखला जाई. अशा या डोंगराळ आणि दुर्गम भागात त्याकाळी कमालीचा अशिक्षितपणा आणि अज्ञान होते. समाज विविध अनिष्ट प्रथा आणि परंपरांच्या विळख्यात अडकलेला होता. विशेषतः महिलांच्या सार्वजनिक वावरण्यावर प्रचंड मर्यादा होत्या आणि त्यांच्यावरील अन्यायाचे प्रमाणही मोठे होते. अशा कठीण काळात आदिवासी-भिल्ल समाजातील सत्पुरुष असलेल्या लक्ष्मणबाबांनी पीडित महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या तंट्यांचा निवाडा करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य बाबांनी केले, म्हणूनच त्यांच्या निधनानंतर एका सामान्य मानसाचे रूपांतर लोकदैवतात झाले.

      आज जिथे नगरपालिकेची इमारत उभी आहे, तिथे सुमारे शंभर वर्षांपूर्वी एक प्राचीन बारव होती. या बारवेच्या काठावरच बाबांची मूर्ती स्थापन करण्यात आली होती. कालांतराने शहराचा विस्तार झाला आणि इमारतींच्या बांधकामात ही बारव गाडली गेली, परंतु भाविकांच्या मनातील बाबांचे स्थान मात्र अढळ राहिले. भाविकांनी लोकवर्गणीतून मूळस्थानी बाबांचे छोटेखानी मंदिर उभारले, ज्याचे रुपांतर नंतर भव्य मंदिरात झाले. या दैवताचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे आजही घरातील लहान मुले विनाकारण रडत असतील, तर त्यांना बाबांच्या चरणी नतमस्तक केले जाते. त्यानंतर काही वेळातच मुलं शांत बसतात, असा अनेकांचा अनुभव आहे. तसेच, पूर्वी ग्रामीण रुग्णालयात येणार्‍या असंख्य रुग्ण व नातेवाईक आजारपणातून मुक्ततेसाठी बाबांना साकडे घालीत व ते पूर्ण करण्यासाठी गुळाचा म्हणजेच ‘शेरी’चा नैवेद्य दाखवला जात, ती परंपरा आजही तितकीच जिवंत आहे.

      यात्रेच्या मुख्य दिवशी, म्हणजेच रविवारी अक्षय्य तृतीयेला पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे. अभिषेक आणि होमहवन झाल्यानंतर सायंकाळी बाबांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत स्थानिक कलापथके आणि फटाक्यांची मोठी आतिषबाजी हे मुख्य आकर्षण असेल. करमणुकीचा वारसा जपत यंदा यात्रा कमिटीने नारायणगावच्या लोकप्रसिद्ध अश्विनी-शिवानी बोरगावकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले आहे. लावणी आणि लोककलेचा हा आविष्कार रविवारी रंगणार आहे.

      यात्रेच्या दुसर्‍या दिवशी, सोमवारी (ता.20) दुपारी नगरपालिका प्रांगणात कुस्त्यांचा जंगी हगामा पार पडणार आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील नामवंत मल्ल पालिकेच्या प्रांगणात आपली कुवत आजमावणार असून, विजेत्यांना एक रुपयापासून पाच हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या भक्ती आणि शक्तीच्या सोहळ्याची सांगता सोमवारी सायंकाळी महाप्रसादाने होणार आहे. यासर्व कार्यक्रमांना आणि बाबांच्या दर्शनाला संगमनेरकरांनी अवश्य यावे असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब अभंग, मार्गदर्शक धनंजय डाके यांच्यासह गजानन मंडलिक, रविंद्र वलवे, संजय भागवत, गणेश काठे, मनोज मंडलिक, भारत काठे, विरु जेधे, नारायण बटवाल, प्रथमेश महाले, रोहीत जेधे, गणेश जेधे, संजय डोखे, सुदाम शिंदे, नंदू मंडलिक यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!