अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १८ व १९ जुलैला ‘येलो अलर्ट’ ; वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा
भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
अहिल्यानगर | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १८ व १९ जुलै रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करत ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. संभाव्य अतिवृष्टी आणि पूरस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी यांनी केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यास भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता दौंड पुलाजवळ भीमा नदीत ३,४७२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस किंवा धरणांतून पाणी सोडल्यास नदीची पातळी झपाट्याने वाढू शकते.

नदीकाठच्या नागरिकांनी पाणीपातळी वाढल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. नदी, ओढे किंवा नाल्यांवरील पूल पाण्याखाली गेल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. धरणे आणि नदी परिसरात फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा छायाचित्रे काढणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याच्या वेळी झाडांखाली, मोकळ्या मैदानात, मोबाईल टॉवर, विजेचे खांब, धातूचे कुंपण किंवा विद्युत रोहित्राजवळ थांबू नये. लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून दूर राहावे आणि विजांचा कडकडाट सुरू असताना विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे तसेच दुचाकींपासूनही सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी जावे. घाट रस्त्यांवरील प्रवास टाळावा तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये. नागरिकांनी स्वतःसह जनावरांचीही काळजी घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाणे, तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, ११२ किंवा १०७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
