निकृष्ट कामांना आता माफी नाही ! विकासकामांतील हलगर्जीपणावर आमदार अमोल खताळ यांचा थेट इशारा

दर्जाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही ; ठेकेदारांवर कठोर कारवाईचे आदेश, अधिकाऱ्यांनाही स्पष्ट शब्दांत सूचना

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर मतदारसंघातील विकासकामांमध्ये हलगर्जीपणा, निकृष्ट दर्जा आणि विलंब करणाऱ्यांना आता कोणतीही माफी मिळणार नसल्याचा स्पष्ट इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावत, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर आणि नियमानुसार कारवाई करा, असे आदेश असल्याची माहिती आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला असून, प्रत्येक रुपया जनतेच्या हितासाठी खर्च झाला पाहिजे. दर्जाहीन कामे, निष्काळजीपणा किंवा वेळकाढूपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे खताळ यांनी ठामपणे सांगितले.

शुक्रवारी (दि. १७) त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंजे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, सहाय्यक अभियंता संजय टेकाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आमदार खताळ यांनी स्पष्ट केले की, शासनाचा निधी हा जनतेच्या विश्वासाचा आहे. त्यामुळे प्रत्येक विकासकाम निर्धारित निकषांनुसार, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झालेच पाहिजे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या किंवा गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

यावेळी कोल्हार–घोटी राज्य मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्नही त्यांनी आक्रमकपणे उपस्थित केला. अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही संबंधित ठेकेदाराने आवश्यक दुरुस्ती न केल्याने हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्यामुळे काही अडचणी असल्या तरी रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. दुरुस्तीची जबाबदारी असतानाही काम न करणाऱ्या ठेकेदारांवरही नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

संगमनेर शहरातील अकोले नाक्यावरील शारदा विद्यालयाजवळील रस्ता तातडीने दुरुस्त करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

याचबरोबर राज्य मार्ग व सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणांबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. वाहतुकीस अडथळा ठरणारी आणि अपघातांना कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तातडीने हटवावीत; मात्र कारवाई करताना सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!