जुलै फॉर काइंडनेस : दयाळूपणाच्या उपक्रमांनी संगमनेर तालुक्यात रुजला जिव्हाळा

यशोधनमधील ‘काइंडनेस ट्री’ ठरले आकर्षण

सोनम वांगचुक यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या विचारांना पाठिंबा दर्शविणाऱ्या कृतींचाही अभियानात समावेश

संगमनेर | प्रतिनिधी

समाजात वाढत चाललेली नकारात्मकता कमी करून एकमेकांप्रती आदर, जिव्हाळा, आत्मीयता आणि दयाळूपणाची भावना रुजावी या उद्देशाने डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘जुलै फॉर काइंडनेस’ (Month of Kindness) या उपक्रमाला संगमनेर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच शहरात दयाळूपणाचे अनेक उपक्रम राबविले जात असून, यशोधन जनसंपर्क कार्यालयातील ‘काइंडनेस ट्री’ हे या अभियानाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात उभारण्यात आलेल्या ‘काइंडनेस ट्री’वर विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी दिवसभरात केलेल्या दयाळूपणाच्या कृतींची नोंद ‘पानां’च्या स्वरूपात करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मकतेचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले आहे.

या अभियानांतर्गत चिमण्या व इतर पक्ष्यांना अन्न-पाणी उपलब्ध करून देणे, वृद्धांना मदतीचा हात देणे, आई-वडिलांना घरकामात सहकार्य करणे, प्रत्येकाशी प्रेमाने व आत्मीयतेने संवाद साधणे, आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे, गरजू व्यक्तींना मदत करणे तसेच पक्षी, प्राणी आणि पर्यावरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असून त्यांच्या कृतींमुळे पालकांनाही सकारात्मक अनुभव मिळत असल्याचे दिसून येत आहे.

यशोधनमधील ‘काइंडनेस ट्री’वर दररोज नवीन उपक्रमांची पाने जोडली जात असून, सेवाभावी कार्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अनेक उपक्रमांची नोंद येथे पाहायला मिळत आहे. पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या विचारांना पाठिंबा दर्शविणाऱ्या कृतींचाही या अभियानात समावेश करण्यात आला आहे.

डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले की , “आजकाल सकाळी टीव्ही सुरू केला किंवा सोशल मीडियावर नजर टाकली की बहुतांश ठिकाणी नकारात्मक बातम्यांचा भडिमार दिसून येतो. समाजात द्वेष आणि तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत माणुसकी, प्रेम, परस्पर सहकार्य आणि दयाळूपणाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने ‘मंथ ऑफ काइंडनेस’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. छोट्या-छोट्या चांगल्या कृतींमधून मोठा सामाजिक बदल घडू शकतो. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आणि परस्परांप्रती आदरभाव वाढविणे, हा या अभियानामागील मुख्य हेतू आहे.”

या उपक्रमात संगमनेर शहरासह तालुक्यातील युवक, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून, समाजात सकारात्मक विचारांची चळवळ उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!